भाडेवाढीनंतर मीटर कॅलिब्रेशनसाठी देण्यात आलेल्या मुदतीस आणखी वाढ देण्यात येणार नाही, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. दिवाळी सुटीमध्येही परिवहन विभागाने आपली कार्यालये कॅलिब्रेटेड मीटरच्या प्रमाणिकरणासाठी उघडी ठेवल्यानंतरही टॅक्सी आणि रिक्षाच्या मीटर कॅलिब्रेशनच्या कामाला गती आलेली नाही.
डॉ. हकीम समितीने शिफारस केल्याप्रमाणे भाडेवाढीनंतर ४५ दिवसांची मुदत मीटर कॅलिब्रेशनसाठी देण्यात आली होती. मात्र या मुदतीत सर्व रिक्षा-टॅक्सींचे मीटर कॅलिब्रेट होऊ शकणार नाहीत. गेल्या काही दिवसांमधील मीटर कॅलिब्रेशनच्या आकडेवारीवरून हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. मात्र परिवहन विभागाने कॅलिब्रेशनला मुदतवाढ मिळणार नाहीच; पण मीटर कॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा-टॅक्सींवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
‘२४ नोव्हेंबरनंतर मीटर कॅलिब्रेशन झाले नसेल तर त्या वाहनावर कडक कारवाई करण्यात येईल. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल किंवा मीटर कॅलिब्रेशन होईपर्यंत त्यांना आपली वाहने रस्त्यावर आणता येणार नाहीत,’ असे परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी सांगितले. मीटर कॅलिब्रेशन करण्यात आलेल्या रिक्षा-टॅक्सींच्या प्रमाणीकरणासाठी परिवहन विभागाने दिवाळीच्या सुटीतही प्रादेशिक कार्यालयेही सुरू ठेवली आहेत. मात्र तरीही रिक्षा-टॅक्सीचालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांना होणाऱ्या संभाव्य कारवाईची अद्याप कल्पना नसल्यामुळे त्यांच्याकडून चालढकल करण्यात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, सुमारे १२ हजार टॅक्सी तर २५ हजार रिक्षांचे कॅलिब्रेशन रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.