रिक्षाचालकांच्या लुबाडणुकीचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. किंबहुना रिक्षाचालकांकडून फसवणुक ही जणू ठरलेलीच असते. परंतु बोरिवलीत राहणाऱ्या एका महिलेला रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचा वेगळाच अनुभव आला. रिक्षात राहिलेला त्यांचा लॅपटॉप रिक्षाचालकाने परत आणून दिल्यानंतर त्यांचा क्षणभर विश्वासच बसला नाही.
बोरिवलीत राहणाऱ्या भूमिका बुवाडन या महिलेने शनिवारी दुपारी तीन वाजता बोरिवलीच्या एक्सर रोड येथून वांद्रे येथे जाण्यासाठी रिक्षा घेतली. वांद्रे येथे उतरल्यानंतर आपला महागडा लॅपटॉप रिक्षात राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. तो रिक्षाचालक गॅस भरायला जाणार होता, हे त्यांना प्रवासादरम्यान समजले होते. त्यामुळे भूमिका यांनी वांद्रे परिसरातील बहुतांश सर्व सीएनजी गॅस पंप पालथे घातले. पण रिक्षावाला काही सापडला नाही. त्यामुळे त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु हल्लीच्या काळात कुणी अशा वस्तू परत करत नाहीत, असे उत्तर त्यांना पोलिसांकडून मिळाले. आपला लॅपटॉप परत मिळणार नाही, असे वाटून निराशेने त्यांनी पोलीस ठाणे सोडले.
या काळात रिक्षाचालक रोहन यादव (३५) याला रिक्षात बॅग आढळली. तो बॅग घेऊन एका इलेक्ट्रीशियनकडे घेऊन गेला. त्या इलेक्ट्रीशियनने तो लॅपटॉप १० हजार रुपयांना विकत घेण्याची तयारी दर्शवली. पण यादवने त्याला नकार देत या महिलेला शोधण्याचे ठरवले. त्याने बोरीवली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी लॅपटॉप उघडला. पण त्यांना काही संदर्भ मिळत नव्हता. लॅपटॉपमध्ये अनेक परदेशी लोकांचे बायोडेटा होते. केवळ एक जेडी नावाचा उल्लेख होता. पोलिसांनी आयपी पत्ता शोधला. पण तोही ‘जेडी’ या सांकेतिक नावाने नोंदविलेला होता. अखेर बऱ्याच तांत्रिक उठाठेवीनंतर पोलिसांनी ई-मेलद्वारे या महिलेला शोधून काढले. ‘जेडी’ हे त्यांच्या पतीचे संक्षिप्त नाव होते. रात्री साडेबारा वाजता त्यांना लॅपटॉप परत मिळाला. लॅपटॉप परत मिळण्याची आशा त्यांनी सोडून दिली होती. परंतु रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणाबद्दल भारावलेल्या भूमिका यांनी यादवला एक हजार रुपयांचे बक्षीस दिले.        

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा