ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या अपुऱ्या बसेस आणि रिक्षा चालकांच्या नकारघंटेमुळे रेल्वे स्थानक ते घोडबंदर मार्गावर प्रवास करण्यासाठी खासगी अनधिकृत बससेवेचा पर्याय स्वीकारणाऱ्या ठाण्यातील शेकडो प्रवाशांनी स्वतसाठी निवडलेला सार्वजनिक वाहतुकीचा हा खासगी मार्गही शुक्रवारी येथील काही अतिउत्साही राजकीय नेत्यांनी बंद पाडला.
घोडबंदर मार्गावरील नागरी वसाहतींमध्ये जाण्यास रिक्षा चालक नकार देत असल्यामुळे ठाणेकर प्रवासी अक्षरश हैराण झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे बहुतांश प्रवासी खासगी बसेसचा आधार घेतात. असे असताना भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळण्याऐवजी खासगी बसेस रिक्षाचे प्रवासी पळविताता अशी ओरड करत रिपब्लिकन पक्षाच्या एकतावादीप्रणीत रिक्षा-टॅक्सी युनियनने शुक्रवारी सकाळी घोंडबंदर मार्गावरील सिनेवंडर सिनेमागृहाजवळ आंदोलन केले. यामध्ये एका बसची तोडफोड करण्यात आली तसेच काही बसेसच्या चालकांसह प्रवाशांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या आंदोलनामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून रिक्षा चालकांच्या मुजोरीकडे डोळेझाक करणाऱ्या या राजकीय नेत्यांनी दळणवळणासाठी उपलब्ध असलेला खासगी बस वाहतूकीचा पर्यायही बंद पाडल्याने शुक्रवारी दिवसभर प्रवाशांचे हाल सुरू होते.
ठाणे महापलिका परिवहन उपक्रमातील (टीएमटी) बससेवेचा उडालेला बोजवारा आणि रिक्षाचालकांची मुजोरी यांना कंटाळून अनधिकृत का होईना परंतु खासगी बसेसचा नवा पर्याय ठाणेकरांनी स्वीकारला आहे. सतत होणाऱ्या फेऱ्या, उत्तम सुविधा आणि प्रवाशांच्या सोयीचे व्यवस्थापन यामुळे या बसेसना नागरिकांची चांगलीच पसंती आहे. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर या बसेसचे प्रमाण मोठे आहे. दिवसाला या मार्गावर चालणाऱ्या अंदाजे ३० खासगी बसेसमधून सुमारे १५ हजार प्रवाशांची ने-आण करण्यात येते. शुक्रवारी रिपाई एकतावादीप्रणीत रिक्षा-टॅक्सी युनियनने आंदोलन करुन घोडबंदर मार्गावरील सिनेवंडर सिनेमागृहाजवळ एका बसची तोडफोड करून बसचालकासह प्रवाशांना मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या बसचालकांनी दिवसभर आपली बससेवा बंद ठेवल्याने हजारो प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. यामुळे प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलन केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान बसची तोडफोड करण्यात आली नसून केवळ हवा काढण्यात आली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. राकेश मिश्रा, प्रमोद लेले, रामसिंग, संतोष दायघुडे, शशिकांत पांडे, आनंद शेलार, विश्वनाथ मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे.

सोयीची सेवा
अतिशय सोयीची असणारी ही बससेवा स्वस्त असल्याने नागरिकाची याला चांगली पसंती आहे. घोंडबंदर मार्गावरील कासारवडवली ते माजिवाडा २५ रुपये आणि माजिवाडा ते स्टेशन २० रुपये असे भाडे एकावेळेच्या प्रवासासाठी रिक्षावाल्यांकडून आकारले जाते. यामुळे रिक्षातून स्टेशनला जाण्यासाठी प्रवाशांना ३५-४० रुपये मोजावे लागतात. याउलट खासगी बसमधून प्रवास केल्यास प्रवाशांना फक्त १० रुपये खर्च येतो. तसेच कुठेही हात दाखविल्यास या बस थांबत असल्याने प्रवाशांची या बसेसना पसंती आहे.

Story img Loader