राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रिक्षाचालकांच्या जीवावर उठले आहेत. सातत्याने रिक्षाचालकांच्या विरोधात निर्णय घेत त्यांनी रिक्षाचालकांना देशोधडीला लावण्याचे कंत्राट खासगी वाहतूकदारांकडून घेतले आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित कामगार नेते शरद राव यांनी केली. येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभरातील १५ लाख रिक्षाचालक मुख्यमंत्री आणि पर्यायाने काँग्रेसच्या विरोधातच प्रचार करतील, असेही त्यांनी ठणकावले. राज्य सरकारच्या या मनमानीबाबत २५ फेब्रुवारी रोजी राज्यभरात रिक्षाचालकांचे शांततापूर्वक आंदोलन होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
रिक्षाचालकांच्या तुलनेने छोटय़ा संघटनांना सरकारने चर्चेमध्ये स्थान दिले. त्याबाबत राव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रिक्षा चालकांसाठी स्थापण्यात येणाऱ्या कल्याणकारी मंडळाच्या चर्चेत मुख्य संघटनेला सातत्याने डावलण्यात आल्याची टीका त्यांनी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत दहावी उत्तीर्ण झालेल्यांनाच रिक्षाचा परवाना देण्यात येईल, या सरकारच्या भूमिकेला आव्हान दिले आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यापासून सातत्याने रिक्षाचालकांचा गळा घोटणारे निर्णय घेतले आहेत. तीनचाकी प्रवासी वाहतूक बंद पाडण्याचे कंत्राटच चारचाकी प्रवासी वाहतूकदारांकडून या मुख्यमंत्र्यांनी घेतले आहे, असा आरोपही शरद राव यांनी केला. आघाडीचे सरकार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसलाही याबाबत काहीच करता येत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र याच आघाडी सरकारमुळे काँग्रेसला रिक्षाचालकांच्या हिताचे निर्णय घेणे जड जात नाही का, असे विचारल्यानंतर त्यांनी मौन बाळगले.
२५ फेब्रुवारी रोजी राज्यभरातील १५ लाख रिक्षा चालक-मालक एका दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करणार असल्याचे राव म्हणाले. या दिवशी धरणे, मोर्चा या माध्यमांतून निषेध व्यक्त केला जाणार आहे.
मात्र हे आंदोलन एवढय़ावरच न थांबता येत्या निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्री आणि पर्यायाने काँग्रेस यांच्या विरोधात राज्यभरातील रिक्षाचालक प्रचार करतील, असे आव्हान राव यांनी दिले.
मुख्यमंत्री रिक्षाचालकांच्या जीवावर उठलेत : राव
राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रिक्षाचालकांच्या जीवावर उठले आहेत. सातत्याने रिक्षाचालकांच्या विरोधात निर्णय घेत त्यांनी रिक्षाचालकांना देशोधडीला लावण्याचे कंत्राट खासगी वाहतूकदारांकडून घेतले आहे,
First published on: 18-02-2014 at 03:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw driver will campaign against prithviraj chavan sharad rao