केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक (मुंबई) सदानंद रावराणे यांना लुटणाऱ्या तिघांपैकी दोघा रिक्षाचालकांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-११ ने गजाआड केले. १५ दिवसांपूर्वी रिक्षातून जात असताना आरोपींनी गोराई बस आगाराजवळ लुटले होते. तसेच त्यांना मारहाण करून रिक्षातून ढकलून दिले होते.
११ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास रावराणे यांनी बोरिवली पूर्व स्थानकाजवळून रिक्षा घेतली. परंतु रावराणे रिक्षात बसल्यानंतर लगेचच तीन इसम रिक्षात घुसले. तब्बल दीड-दोन तास बोरिवली परिसरात त्यांनी रिक्षा फिरविली आणि रात्री साडेअकराच्या सुमारास गोराई डेपो येथे रावराणे यांना आरोपींनी मारहाण करून त्यांच्याजवळील दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज लुटला. इतकेच नव्हे तर त्यांना रिक्षातून ढकलून देऊन रिक्षासह पोबारा केला होता. त्यानंतर रावराणे यांनी पोलीस ठाणे गाठून घडल्याप्रकाराबाबत गुन्हा नोंदविला होता.
लुटण्याचे दिवसेंदिवस वाढणारे प्रकार लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच मोहीमेच्या दरम्यान, दोन अज्ञात चोरटे बोरिवली पश्चिम येथील चंदावरकर लेनजवळील रिक्षातळावर येणार असल्याची माहिती  मिळाल्यावर सोमवारी सापळा रचून या दोघांनाही अटक करण्यात आली.
चौकशीत या दोघांनीच रावराणे यांना लुटल्याचे उघड झाले. वसीम सलीम पठाण (२७), रमजान शौकतअली शेख (३०) अशी चोरटय़ांची नावे आहेत.
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक रघुनाथ दळवी, पोलीस निरीक्षक संजीव भोळे, प्रवीण कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, प्रदीप मोरे, साटम, सहाय्यक पोलीस फौजदार रामचंद्र गोळे यांनी ही कारवाई केली.