रिक्षा-टॅक्सी दरवाढीवरून उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले असतानाच रिक्षांसाठी एकतर्फी तीन रुपये दरवाढ करण्याच्या निर्णयाबद्दल काँग्रेसचे नेते खासगीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करू लागले आहेत.
रिक्षाचे भाडे १२ रुपयांवरून एकदम १५ रुपये करण्याच्या निर्णयावरून सर्वसामान्यांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे. तीन रुपये भाडे एकदम वाढविण्याची गरज होती का, असा प्रवाशांचा सवाल आहे. आधीच इंधन दरवाढ आणि गॅस सिलिंडरवरून सामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. त्यातच रिक्षा-टॅक्सीच्या भाडय़ात वाढ झाली. परिवहन खाते हे मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे असून त्यांनीच या अहवालावर अनुकूल भूमिका घेतली होती. दरवेळी इंधन दरवाढीनंतर एक रुपये किमान भाडय़ात वाढ केली जाते. तीन रुपये एवढी वाढ कधीच झाली नव्हती. दरवाढीच्या तुलनेत सीएनजी गॅसमध्ये वाढ झाली नव्हती याकडे लक्ष वेधण्यात येते. परिवहन खाते हे मुख्यमंत्र्यांकडे असल्याने राष्ट्रवादीने नेहमीप्रमाणे टोकाची भूमिका घेण्याचे टाळले. त्यातच कामगार नेते शरद राव हे राष्ट्रवादीच्या जवळचे असल्याने पक्षाने त्यांना मदत होईल अशी भूमिका घेतली. दरवाढीमुळे सारी टीका ही काँग्रेसला सहन करावी लागत आहे. तीन रुपये एकदम दरवाढ करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या पातळीवर चर्चा करणे आवश्यक होते, असा सूर आहे. निदान मुंबई, ठाण्यातील नेत्यांना विश्वासात घेतले असते तरी जनतेच्या भावनांचा अंदाज आला असता. पोलीस आयुक्तपदावरून अरुप पटनायक यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली वा रिक्षा भाडेवाढ यावरून काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तीव्र नाराजी आहे.