मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानक पूर्व परिसरात काही मुजोर रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असून यामुळे बेस्ट बसला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आशा मुजोर रिक्षाचालकांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच लोकमान्य टिळक टर्मिनस आहे. या टर्मिनसवर प्रवाशांना घेऊन जाणारे काही रिक्षाचालक रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभे करीत असल्याने वाहतूक कोंडी होते. इतर रिक्षा-टॅक्सी चालक, अन्य वाहने यामुळे बेस्ट बसला अडथळा निर्माण होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कुर्ला रेल्वे स्थानकातून शिवाजी नगर परिसरात वातानुकूलित मोठी बस सोडण्यात येत आहे. कुर्ला पूर्व येथील बस आगार लहान असल्याने येथे बस वळवता येत नाही. परिणामी आगाराबाहेरच बेस्ट बसला वळण घ्यावे लागते. मात्र, याचवेळी काही मुजोर रिक्षाचालक रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या करीत असल्याने वळण घेण्यास बस चालकाला त्रास होत आहे.
हेही वाचा…पारसी कॉलनी जिमखान्यातील लग्न समारंभांमुळे रहिवासी त्रस्त
ग
अनेकदा हे रिक्षाचालक बेस्ट चालक आणि टॅक्सी चालकांसोबत वाद घालून हमामारीवर उतरतात. याबाबत तक्रारी केल्यानंतरही वाहतूक पोलीस या रिक्षाचालकांविरोधात कारवाई करीत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी वाढत आहे.
हेही वाचा…मानवी चुका, यंत्रणेतील दोष, बोटीला जलसमाधी, बस, रस्ते अपघातांतील जीवितहानीचे मावळते वर्ष साक्षीदार
प्रवाशांबरोबर वाद
कुर्ला रेल्वे स्थानकातून दररोज लोकमान्य टिळक टर्मिनसवर शेकडो प्रवासी जात असतात. कुर्ला रेल्वे स्थानक आणि टर्मिनसमध्ये अवघे दीड किलोमीटर अंतर आहे. मात्र, काही रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे पैसे घेण्याऐवजी ४०० ते ५०० रुपये घेऊन त्यांची लूट करीत आहेत. याबाबत नेहरूनगर आणि टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मात्र, मुजोर रिक्षाचालकांविरोधात अद्याप कारवाई केली नाही. त्यामुळे प्रवाशांची लूट सुरूच आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.