मुंबई : गेल्या काही वर्षांपासून लोकमान्य टिळक टर्मिनसवर रिक्षा आणि टॅक्सीचालक प्रवाशांची लूट करीत आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनसवर एका प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकाविरोधात टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या दोघांनाही अटक करण्यात आली.
लोकमान्य टिळक टर्मिनसवरील काही रिक्षा आणि टॅक्सीचालक जवळच्या अंतरावर जाण्यासाठी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर भाडे घेऊन त्यांची लूट करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही लूट सुरू असून पोलीस मात्र काहीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांची लूट सुरूच आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कुर्ला परिसरात राहणारे मोहम्मद चांद गावी जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनसवर आले होते. यावेळी टॅक्सीचालक सतीश सिंह (४०) आणि रिक्षाचालक आशिष सपकाळ (२३) यांनी चांद यांच्याकडून जबरदस्ती ७०० रुपये काढून घेतले. या सर्व घटनेचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर टिळकनगर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ गुन्हा दाखल केला.
हेही वाचा – मुंबई : तणावाखालील डॉक्टरांना नैराश्यमुक्त करण्यासाठी नायर रुग्णालयाचा ‘श्रुती’ उपक्रम
प्रवासी चांद यांच्याशी संपर्क साधून पोलिसांनी रिक्षा आणि टॅक्सीचालकाची माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून या दोन्ही आरोपींना चेंबूरमधील सुभाष नगर परिसरातून अटक केली. या आरोपींनी अशाच प्रकारे अनेक प्रवाशांना लुटले असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.