लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: रस्त्यालगत उभी केलेली रिक्षा चोरून विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी तीन रिक्षा हस्तगत केल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनी परिसरात राहणारे रिक्षाचालक प्रदीप माने (२५) यांनी आपली रिक्षा घराजवळ उभी केली होती. मात्र अज्ञात चोराने रात्री रिक्षा चोरली. याप्रकरणी माने यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचा शोध सुरू केला. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासल्यानंतर पोलिसांना शिवाजी नगर परिसरात एका रिक्षाचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ती माने यांची चोरीला गेलेली रिक्षा असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी रिक्षाची कसून तपासणी केली. पोलिसांना रिक्षामध्ये एक मोबाइल सापडला. या मोबाइलच्या आधारे तपास करून पोलिसांनी आरोपी करीम काजी (३२) याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मानखुर्द परिसरातून दोन तर ट्रॉम्बे परिसरातून एक अशा एकूण तीन रिक्षा त्याने चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी काजीला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader