मुंबईच्या १२ रिक्षा उत्तर अमेरिकेच्या वस्तुसंग्रहालयात
मुंबईतील रस्त्यावर दिवसभरात फार फार तर पन्नास ते साठ किलोमीटर अंतर कापणारी आणि मुंबईकरांच्या जिव्हाळ्याची रिक्षा आता जहाजातून समुद्रमार्गे तब्बल दहा हजारांहून अधिक नाविक मैल (हजारो किलो मीटर) अंतर कापून थेट उत्तर अमेरिकेच्या वस्तुसंग्रहालयात जाणार आहे. एक दोन नव्हे तर बारा रिक्षा मुंबईतून थेट अमेरिकेला पाठवण्यात येणार आहे. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाणार आहे.
गेल्या साठ वर्षांहून अधिक काळापासून भारतीय राजकारणात स्थान मिळवणारी आणि मजबूत मोटार म्हणून ओळख मिळवलेली अॅम्बॅसिडरने अमेरिकेच्या वस्तुसंग्रहालयात स्थान मिळवले आहे. तसेच ७०-८० च्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या लुना, लँब्रेटा, फियाट या गाडय़ांचीही याआधी अमेरिकेच्या वस्तुसंग्रहात वर्णी लागली आहे. याच धर्तीवर आता मुंबईकरांची रिक्षाही या पंगतीत मानाने उभी राहणार आहे. मुंबई-पुणे शहरात सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षाचा वापर केला जातो. मात्र प्रवासी वाहतूक किंवा व्यावसायिक उद्देशाने वाहनाची नोंदणी केली असेल तर अशा वाहनांची परदेशात निर्यात करता येत नाही. मात्र रिक्षाची लोकप्रियता पाहता, अमेरिकेतील वस्तुसंग्रहालयात रिक्षा पाठवण्याचा निर्णय माहीमच्या डॉ. सुधीर घोष यांनी घेतला आहे. यापूर्वीही त्यांनी भारतीय बनावटीची विधिध वाहने अमेरिकेच्या संग्रहालयात पाठवली असल्याचे सांगण्यात आले.

रिक्षा परदेशात पाठवण्यासाठी..
’ परदेशात वाहन पाठवताना त्या सरकारची आणि परिवहन विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर त्यांच्याकडून एक रीतसर पत्र देण्यात येते.
’ भारतातून वाहन पाठवताना वाहनाच्या खरेदीच्या रकमेपेक्षा अधिक टक्के जकात कर भरावा लागतो. यात नव्या वाहनासाठी १०२ टक्के तर वापरात आलेल्या वाहनासाठी १६० टक्के कर भरावा लागतो.

’ त्यानंतर मोटार वाहन कायदा-१९८८, केंद्रीय मोटार वाहन नियम-१९८९ आणि केंद्र सरकारच्या ‘एक्झिम धोरण’-२००१ नुसार त्या वाहनाची तपासणी करावी लागते. यातनंतर प्रादेशिक परिवहन विभागात वाहनाची तात्पुरती काळासाठी नोंदणी करावी लागते. यात वाहनासंदंर्भातील अनेक कागदपत्राची पडताळणी केली जाते. त्यानंतर कोणत्याही राज्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून स्थायी नोंदणी केली जाते.

बारा रिक्षा परदेशात पाठवण्याची प्रक्रिया आम्ही करीत आहोत. माहीमला राहणारे डॉ. सुधीर घोष हे परदेशात डॉक्टरी करीत असल्याने त्यांच्या वत्तीने मी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करीत आहे. या सर्व रिक्षा अमेरिकेच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. यासाठी नुकताच १४ हजारांचा पर्यावरण कर भरला आहे. यापूर्वीही अनेक गाडय़ा अमेरिकेतील वस्तुसंग्रहालयात ठेवण्यासाठी पाठवल्या आहेत.
– अतुल अमृते, अंधेरी

Story img Loader