सुशांत मोरे
राज्यभरात दीड वर्षांत ३१ हजार जणांवर कारवाई; मुंबई-ठाण्यात १४ हजार प्रकरणे
भाडे नाकारणे, मीटरमध्ये फेरफार करणे, प्रवाशांशी उद्धटपणे वागणे आदी कारणांमुळे गेल्या दीड वर्षांत राज्यभरात सुमारे ३१ हजार रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असली तरी रिक्षाचालकांची मनमानी कमी झालेली नाही. यांपैकी बहुतेक म्हणजे १४ हजारांहून अधिक रिक्षाचालक मुंबई, ठाण्यातील आहेत. मुंबईत या काळात सहा हजार ८८० रिक्षाचालकांवर परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाई केली आहे. तर ठाणे, कल्याण, वाशी, वसईमध्ये तब्बल सात हजार ९१५ चालकांवर कारवाई झाली आहे.
रिक्षात क्षमतेपेक्षा जादा प्रवासी कोंबल्याबद्दल चालकांवर कारवाई होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. एप्रिल, २०१७ ते मार्च, २०१८ दरम्यान सात हजार तर एप्रिल ते सप्टेंबर, २०१८ दरम्यान सहा हजार ९४७ चालकांवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केल्याबद्दल कारवाई करण्यात आली. या चालकांचा परवाना व लायसन्स निलंबित करण्याबरोबरच त्यांना दंडही आकारण्यात आला.
गैरवर्तन केलेल्या किंवा वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलीस व आरटीओकडून कारवाईचा बडगा उचलला जातो. प्रवाशांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींनंतर आरटीओने ठिकठिकाणी रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम राबवली. राज्यात एप्रिल, २०१७ पासून सप्टेंबर, २०१८ पर्यंत एकूण ३१ हजार ५४१ रिक्षाचालकांविरोधात कारवाई करण्यात आली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कारवाई करूनही रिक्षाचालकांना शिस्त न लागल्याचे ठिकठिकाणी दिसत आहे. जादा भाडे आकारणे, भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धटपणे वागणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबणे आदी गैरप्रकार सुरूच आहेत.
रिक्षाचालकांचा मनमानी कारभार हा मुंबई, ठाण्यात सर्वात जास्त आहे. मुंबईच्या सर्व आरटीओमध्ये मिळून एप्रिल, २०१७ पासून आतापर्यंत सहा हजार ८८० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. तर ठाणे आरटीओअंतर्गत येणाऱ्या ठाणे, कल्याण, वाशी, वसईमध्ये सात हजार ९१५ चालकांवर कारवाई झाली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, कराडमध्ये मिळून दोन हजार ३०० पेक्षा जास्त, तर पुणे, सोलापूर, बारामती, पिंपरी चिंचवड, अकलुज या पुणे कार्यालयांतर्गत केलेल्या कारवाईत दोन हजार ५४७ चालक दोषी आढळले आहेत.
दीड वर्षांतील कारवाई
* एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ – २०,४५९
* एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८ – ११,०८२
परवाना, लायसन्स निलंबन
* एप्रिल २०१७ ते मार्च २०१८
* परवाने- ३,८९७
* लायसन्स – ४,१४६
एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८
* परवाना- १,६५९
* लायसन्स -२,०५९