मुंबई : आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जाहीर करतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही (शरद पवार) स्वबळाचा सूर लावल्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना मुंबई, ठाणे, नागपूरपासून सर्वत्र महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी स्वबळावर लढवाव्या असे वक्तव्य राऊत यांनी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठोपाठ काँग्रेसनेही मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. या भावना पक्षश्रेष्ठींना कळवू आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मुंबईपासून नागपूरपर्यंत कसे लढायचे याचा निर्णय घेतील, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा >>> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?

काँग्रेस श्रेष्ठींना भावना कळवू

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेत्यांना कळवणे हे आमचे काम आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म पाळून आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने प्रयत्न केला. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाचे मत मांडले तसेच काँग्रेसचे मतही आम्ही मांडू, असेही गायकवाड म्हणाल्या. शिवसेनेला आमच्याबरोबर राहायचे नसेल तर हरकत नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढेल. शेवटी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी नैसर्गिक आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांच्या विधानाचे आश्चर्य काहीच वाटले नाही. शिवसेना – भाजप युती असताना दोन्ही पक्ष महापालिका निवडणुका स्वबळावर लढत असत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही आम्ही दोन्ही पक्ष वेगळे लढत होतो, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगत राष्ट्रवादीही स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे संकेत दिले.

आघाडीमध्ये कोणताही निर्णय घेताना चर्चा करून घेतला पाहिजे. पण परस्पर कोणी निर्णय जाहीर करत असेल तर काँग्रेस पक्षही त्यांचा निर्णय घेईल. – वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेस अध्यक्ष

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rift grows in maha vikas aghadi shiv sena ubt likely to contest maharashtra local bodies polls alone zws