मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या राज्यातील पराभवाचे खापर समाजमाध्यम विभागावर फोडण्यात येत असल्याने पक्षांतर्गत धुसफूस सुरू आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी यूट्यूबवरील वक्तव्यात समाजमाध्यम विभागाच्या सुमार कामगिरीसाठी प्रभारी श्वेता शालिनी यांना जबाबदार धरून टीका केल्याने त्यांनी तोरसेकर यांना बदनामीची कायदेशीर नोटीस पाठविली. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने शालिनी यांनी ही नोटीस मागे घेतली. भाजप संविधान बदलणार, मराठा व ओबीसी आरक्षण वाद आदी मुद्द्यांवर विरोधकांनी खोटा प्रचार केल्याने राज्यात भाजपला मोठा फटका बसला. हा प्रचार खोडून काढण्याची जबाबदारी समाजमाध्यम विभागाची होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवीन गृहसंकुलात मराठी माणसाला ५० टक्के आरक्षण; उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे अशासकीय विधेयक

शालिनी यांनी विरोधकांना पैसे दिले, प्रसिद्धीमाध्यमांना जाहिराती दिल्या, यासह अन्य मुद्द्यांवर तोरसेकर यांनी यूट्यूबवरील आपल्या भाषणात शालिनी यांच्यावर टीका केली. आपण शालिनी यांना ओळखत नसून भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचा दावा तोरसेकर यांनी केला होता. आपल्याशी न बोलता व आपल्याबद्दल कोणतीही माहिती नसताना टीका करून बदनामी केल्याने शालिनी यांनी वकिलामार्फत तोरसेकर यांना कायदेशीर कारवाईची नोटीस पाठविली. गेली १७ वर्षे आपण भाजपमध्ये काम करीत असल्याचे त्यांनी नोटीशीत म्हटले होते. मात्र यावरून भाजपमध्ये खळबळ माजली आणि ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोचली. वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शालिनी यांनी कायदेशीर नोटीस मागे घेत असल्याचे समाज माध्यमांवर जाहीर केले. यासंदर्भात जबाबदार कोण आहे, याची पक्षांतर्गत चौकशी करण्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले असून तोरसेकर यांनी आपल्याविरूद्ध खोटी माहिती देणाऱ्यांची नावे सांगावीत. लोकसभा निवडणुकीत प्रसिद्धीमाध्यमांना जाहिराती, पैसे देण्याची कोणतीही जबाबदारी नव्हती, असे शालिनी यांनी स्पष्ट केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rift within party over bjp s defeat in the lok sabha elections is being blamed on the social media department zws
Show comments