शिवसेनाप्रमुखपद हे बाळासाहेबांनीच निर्माण केले होते, त्यामुळे ते पद रिक्त ठेवण्यासंदर्भात घेण्यात आलेला निर्णय योग्य असल्याचे मत राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केले. माधवराव गाडगीळ अहवालामुळे कोकणात नवा प्रकल्प उभा राहू शकत नाही, त्यामुळे कोकणचा विकास खुंटेल, अशी भीतीही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने ‘ग्लोबल कोकण पर्यटन परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या समारोप कार्यक्रमात राणे बोलत होते. त्या वेळी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक किशोरी गद्रे, आयआरबीचे दत्तात्रय म्हैस्कर यांच्यासह विविध पक्षांतील नेतेमंडळी आणि नागरिक उपस्थित होते.  जैतापूर प्रकल्पास बाहेरील मंडळींकडूनच विरोध झाला, असे सांगत राणे यांनी हा प्रकल्प आमच्या इथे होणार आहे, त्याचे काय करायचे ते आम्ही ठरवू, असेही सांगितले. पर्यटनातूनच कोकणचा विकास होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच कोकणाच्या मुळावर कोणीही आले तर त्याला विरोधही केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी उपस्थित कोकणवासीयांना दिला. कोकणात येऊ घातलेल्या नवनवीन प्रकल्पांची, उद्योगधंद्यांची आणि कोकणच्या किनारपट्टीवर सुरू होणाऱ्या मिनी ट्रेनसंदर्भातही त्यांनी या वेळी माहिती दिली.    

Story img Loader