मुंबई : काही वर्षांपासून हृदयविकारासंदर्भातील आजारांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली असून अवघ्या तिशीत तरुणांनाही हृदयविकाराचा त्रास होऊ लागला आहे.  बदलती जीवनशैली, अयोग्य आहार पद्धती, वाढता ताणतणाव, मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन ही प्रमुख  कारणे यामागे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितली. तरुणांनी हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी या बाबी टाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. श्रेयस याच्याप्रमाणेच  तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरामध्ये हृदयरोगामुळे दरवर्षी १८ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. अन्य आजाराने होणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेत हे प्रमाण ३२ टक्के आहे. भारतामध्ये हृदयरोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे २७ टक्के असून, ४० ते ६९ वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण ४५ टक्के आहे.

हेही वाचा >>> मुंबईतील वीजग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर; मीटर बदलण्याचे काम अदानी कंपनीला

बदललेली जीवनशैली,  ताणतणाव, अयोग्य आहार, मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन,  जागरण करणे ही महत्त्वाची कारणे भारतातील हृदयविकाराने वाढत असलेल्या मृत्यूची आहेत, असे हृदयविकारतज्ज्ञ सांगतात. 

पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करणाऱ्या तरुणाईची जीवनशैली बदलली आहे. जागरण, धूम्रपान, मद्यपानासह दुग्धजन्य पदार्थ, केकसारखे पदार्थ खाण्याकडे कल वाढला आहे. यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रेरॉल वाढून ते हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा होते. त्यामुळे धमन्यांमधील पडदा कमकुवत होऊन तो फाटल्याने कॉलेस्ट्रॉल रक्ताच्या संपर्कात येऊन रक्ताच्या गाठी तयार होतात. यामुळे हृदयविकाराचा त्रास होत असल्याचे केईएम रुग्णालयातील हृदयविभागाचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. अजय महाजन यांनी सांगितले.

 आपल्या पूर्वजांपासून आपण खात आलेल्या पारंपरिक अन्नपदार्थातील घटकांनुसार आपल्या शरीरातील गुणसूत्रांची साखळी तयार होते. आपण ‘फास्टफूड’मुळे त्या साखळीला हानी पोहोचवत आहोत. त्यामुळे पारंपरिक अन्नपदार्थाचा आहारात समावेश केल्यास हृदयविकाराचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते, असेही डॉ.  महाजन यांनी सांगितले.

काय करावे ?

दररोज नियमित योगासने करणे, ध्यानधारणा, व्यायाम करणे आवश्यक आहे.  पुरेशी झोप घेणे, फळे, सकस आहार, पालेभाज्या खाण्यावर भर द्यावा. धूम्रपान, मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन टाळावे.

रक्तदाब, मधुमेहाकडे दुर्लक्ष धोकादायक..

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण प्रचंड तणावाखाली आहेत. त्यामुळे ते जागरण, धूम्रपान व मद्यपानाच्या आहारी जात आहेत. परिणामी त्यांना मधुमेह, रक्तदाबसारखे त्रास सुरू होत आहेत. मात्र, त्याबाबत फारशी जागरूकता नसल्याने ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्याची परिणती हृदयविकाराच्या झटक्यामध्ये होत आहे.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या थंडीच्या दिवसांमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांचा आकार कमी होतो. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रेरॉल, मधुमेह, रक्तदाब यासारख्या व्याधी असतात, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे रात्री झोपल्यानंतर सकाळपर्यंत रक्तदाब काहीसा वाढतो, त्यामुळे सकाळी हृदयविकारचा झटका येण्याची शक्यता आहे.

डॉ. अजय पांडे, हृदयविकारतज्ज्ञ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rise in heart attacks among young people due to change in lifestyle zws
Show comments