देशाच्या उभारणीत नेहरू-गांधी परिवाराचा वाटा किती मोठा आहे, हे अभिनेते ऋषी कपूर यांना माहिती नाही, असे सांगत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी बुधवारी ऋषी कपूर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. काही लोक केवळ सत्तेचा फायदा घेण्यासाठी कोणावर काहीही टीका करतात. ते संकुचित मनाचे असतात, असाही टोला निरुपम यांनी लगावला आहे.
प्रत्येक प्रकल्पाला गांधी परिवाराचेच नाव का?, ऋषी कपूर यांची टीका
निरूपम म्हणाले, देशातील प्रत्येक वास्तूला केवळ गांधी परिवारातील लोकांचीच नावे दिलेली नाहीत. इतरही थोर पुरुषांची नावे दिली आहेत. त्याची यादीच आपण ऋषी कपूर यांना पाठवली आहे. त्याचबरोबर महिला सशक्तीकरण आणि पंचायत राज या क्षेत्रात दिवंगत राजीव गांधी यांनी केलेल्या पायाभूत कामाचाही ऋषी कपूर यांना पत्ताच नाही. त्यामुळे ते अशी टीका करताहेत.
देशातील प्रत्येक प्रकल्पाला गांधी परिवाराचेच नाव का, असा प्रश्न त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ऋषी कपूर यांनी उपस्थित केला. समाजासाठी ज्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांची नावे देशातील वेगवेगळ्या प्रकल्पांना दिली पाहिजेत. प्रत्येक वास्तूला गांधी परिवारातील नेत्यांची नावेच का? मला तरी हे पटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय निरूपम यांनी त्याला उत्तर दिले.

Story img Loader