ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वातील ही दुसरी दु:खद बातमी समोर येत आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. ‘तो गेलाय.. ऋषी कपूर गेलाय.. आणि मी उध्वस्त झालोय’; असं ट्विट बिग बींनी केलं.
T 3517 – He’s GONE .. ! Rishi Kapoor .. gone .. just passed away ..
I am destroyed !— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 30, 2020
ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.
कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. मला पुन्हा काम मिळेल ना, अशी चिंता ते मुलांकडे व पत्नीकडे व्यक्त करायचे.