मुंबई : गेल्या महिनाभरापासून सातत्याने तापमानात वाढ हो असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. मागील काही दिवसांपासून उलट्या, जुलाबाचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असून कावीळ झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

सातत्याने तापमान वाढत असल्याने नागरिकांना निर्जलीकरणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिक रस्त्यावर मिळणारे लिंबू सरबत किंवा लस्सी, ताक, छास व शीतपेये पिण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र सरबत, छास, ताक यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

वाढत्या तापमानामुळे लागणारी तहान भागविण्यासाठी नागरिक रस्त्यावरील सरबत, ताक आदींचे सेवन करीत आहेत. दुषित पाण्याचा वापर करून तयार केलेले सरबत, ताक आदींचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी उलट्या, जुलाब, उन्हाळे यांसारख्या आजाराने नागरिक त्रस्त होत आहेत. या आजारांवरील उपचारासाठी दररोज रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती जे.जे. रुग्णालयातील जनऔषध वैद्यकीय विभागातील पथक प्रमुख मधुकर गायकवाड यांनी दिली.

दुषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

वाढते तापमान व आर्द्रतेमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तसेच त्यांना निर्जलीकरणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. निर्जलीकरणामुळे नागरिक मिळेल ते पेय पित आहेत. त्यामुळे रस्त्यावर सहज मिळणारे लिंबू सरबत, आईस्क्रिम, छास, ताक पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये पदार्थ लगेचच खराब होतात.

अनावधानाने खराब पदार्थ व दुषित पाण्यांच्या सेवनामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढले आहे. नागरिक उलटी, जुलाब यासारख्या आजाराने त्रस्त होत आहे. मागील काही दिवसांमध्ये या रुग्णांचे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहे. तसेच या कालावधीत नागरिकांना लघवीमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.

कावीळच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

नागरिक अनवधानाने दुषित पाण्याचा वापर करून तयार केलेले सरबत, ताक आदींचे सेवन करीत असल्याने ‘हेपेटाईटीस ए’ व ‘हेपेटाईटीस ई’चा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णांच्या संख्येत काही दिवसांपासून वाढ होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

काय काळज घ्याल

– घरातून बाहेर पडताना सोबत पाणी घ्यावे.

– रस्त्यावर मिळणारे लिंबू सरबतासारखे पेय पिणे टाळावे

– डोक्यावर टोपी घालावी

– सैल कपडे घालावे – शरीर निर्जलीकरण होणार नाही यासाठी वारंवार पाणी प्यावे