मुंबई : राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १ मार्चपासून आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे १८४ रुग्ण सापडले आहेत. गेल्या दोन आठवड्यांत धुळे, ठाणे व वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. सध्या उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण हे धुळ्यात असून, त्याखालोखाल ठाणे, नाशिक आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये रुग्ण सापडले आहेत.

राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून काही जिल्ह्यांमधील तापमान हे ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. १ मार्चपासून २६ एप्रिलपर्यंत राज्यात १८४ उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील १४ दिवसांमध्ये १०२ उष्माघाताचे रुग्ण सापडले आहेत. त्यात धुळे, ठाणे आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्माघाताचे रुग्ण सापडले आहेत. १३ ते २६ एप्रिल या कालावधीत सापडलेल्या १०२ रुग्णांमध्ये धुळे जिल्ह्यात १७ रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या २० झाली आहे. त्याखालोखाल ठाणे व वर्ध्यात प्रत्येकी १६ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या अनुक्रमे १९ आणि १६ इतकी झाली आहे. तसेच नाशिक येथे ११ रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या १७ झाली आहे. साताऱ्यात १३ नवे रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा…थंड हवेची ठिकाणे तापली, मुंबई ठाण्यात उन्हाचा तडाखा

मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये रुग्णांमध्ये वाढ

मार्चपासून तापमान वाढण्यास सुरूवात होते. त्यामुळे १ मार्चपासून उष्माघाताच्या रुग्णांची नोंद केली जाते. राज्यात १८४ रुग्ण उष्माघाताचे आढळले असून, सर्वाधिक रुग्ण एप्रिलमध्ये सापडले आहेत. मार्चमध्ये ४० रुग्ण आढळले तर १ ते २६ एप्रिलपर्यंत १४४ रुग्ण सापडले आहेत.

कमी रुग्ण असलेले जिल्हे

अकोला, औरंगाबाद, भंडारा, हिंगोली, नागपूर, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण, रायगड, नांदेड, जळगाव, नगर, बीड, चंद्रपूरमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण, अमरावती, गडचिरोली, उस्मानाबाद, यवतमाळ येथे प्रत्येकी तीन रुग्ण, परभणीमध्ये चार, गोंदिया, कोल्हापूर येथे प्रत्येकी पाच तर पुण्यात सहा रुग्ण सापडले आहेत.

सहा जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण नाही

लातूर, नंदुरबार, सांगली, वाशिम या जिल्ह्यांबरोबरच मुंबई शहर व उपनगरामध्ये एकही रुग्ण आढळला नाही.

हेही वाचा…माजी पोलीस आयुक्त संजय पांडेही उत्तर-मध्य मुंबईतून इच्छुक, अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याची शक्यता

सर्वाधिक रुग्ण असलेले जिल्हे

जिल्हा रुग्ण
धुळे – २०
ठाणे – १९

नाशिक – १७
वर्धा – १६

बुलढाणा – १५
सातारा – १४

सोलापूर – १३
सिंधुदुर्ग – १०

जालना – ९

हेही वाचा…मुंबई : मतदान केंद्रांवर ‘आपला दवाखाना’ आरोग्य सेवा पुरवणार

काय काळजी घ्यावी?

उष्माघातापासून स्वत:चे संरक्षणण करण्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्या, थंड ठिकाणी रहा, योग्य पोशाख परिधान करा, दिवसाच्या सर्वात उष्ण वेळेत कामे कमी करण्याचा प्रयत्न करा, सूर्यापासून स्वतःचे रक्षण करा, पंखे आणि वातानुकूलितचा वापर करा, जेणेकरून त्रास कमी होईल. – डॉ. कैलास बाविस्कर, सहसंचालक, आरोग्य सेवा विभाग