मुंबई : वाढत्या तापमानामुळे उलट्या, जुलाब, त्वचाविकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता असून वाढत्या तापमानामुळे डोळ्यांतील बुब्बुल कोरडे होऊन संसर्ग होण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे उन्हात जाताना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

राज्यामध्ये सातत्याने वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे उलट्या, जुलाब आणि त्वचाविकारांचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम डोळ्यावरही होत आहे.

सतत उन्हामध्ये फिरल्याने डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे असा त्रास होण्याची शक्यता असते. याकडे दुर्लक्ष केल्यास काही दिवसांने डोळ्यातील बुब्बुल कोरडे होऊ लागतात. त्यामुळे डाेळ्यांना संसर्ग हाेण्याची शक्यता निर्माण होते. सध्या डोळे चुरचुरणे, आग होणे यासारख्या समस्या नागरिकांना भेडसावू लागला आहेत. त्यामुळे नागरिकांनी उन्हामध्ये जाताना काळजी घ्यावी. – डॉ. शशी कपूर, ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ

काही नागरिकांचे काम फिरतीचे असते. त्यामुळे त्यांना सतत उन्हामध्ये फिरावे लागते. तसेच बांधकाम, रस्तेविषयक काम करणारे कामगार सातत्याने उन्हामध्ये असतात. कडक उन्हाची किरणे थेट डोक्यावर पडतात आणि त्यामुळे शरीरावर परिणाम होतो. दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे डोळ्यांवर अधिक परिणाम होतो. वाढत्या तापमानाबरोबरच धुळीचे प्रमाणही अधिक असल्याने उन्हामध्ये काम करणाऱ्या नागरिकांचे डोळे चुरचुरणे, लाल होणे अशी किरकोळ लक्षणे आढळतात. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास डोळ्यातील बुब्बुले कोरडी पडण्यास सुरुवात होते. परिणामी काही दिवसांनी नेत्रसंसर्ग हाेण्याची शक्यता निर्माण होते. – डॉ. अजय सांबरे, अध्यक्ष, कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन्सचे (सीपीएस)

उन्हाळ्यात डाेळ्यांचा त्रास वाढतो. त्यातच मुंबईमध्ये असलेले प्रदूषण आणि वाढते तापमान यामुळे डोळ्यांच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिक मोबाइलचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत असून यामुळे डोळ्यांना इजा हाेण्याची शक्यता असते. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे डोळे कोरडे होण्याची समस्या उद्भवू शकते. – डॉ. नयना पोतदार, नेत्रविभाग प्रमुख, नायर रुग्णालय

काय काळजी घ्याल

– उन्हात बाहेर जाताना गॉगल्स आणि टोपी घालावी- अधूनमधून डोळ्यावर थंड पाणी मारावे

– कामाच्या दरम्यान अधूनमधून ३ ते ५ मिनिटे डोळ्यांवर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या

– डोळ्यात कोरडेपणा जाणवल्यास नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने आय ड्रॉप्स घालावे