मुंबई : जुलैमध्ये कोसळलेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेली ओढ यांमुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ लागला होता. मुंबईमध्ये जुलैच्या तुलनेत साथरोग रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र असे असले तरी ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ाच्या तुलनेत दुसऱ्या आठवडय़ात हिवताप, गॅस्ट्रो, डेंग्यूचे अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या आजारांचा धोका अद्यापही कायम आहे. मात्र स्वाइन फ्लू, काविळ, चिकनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर लेप्टोच्या रुग्णांची संख्या स्थिर आहे.
जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये साथीच्या आजारांनी डोके वर काढले होते. मात्र ऑगस्ट सुरू होताच पावसाने ओढ घेतली. त्यामुळे साथीच्या रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली. जुलैच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी अद्याप हिवताप, डेंग्यू, गॅस्ट्रोचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात सापडत आहेत. ऑगस्टच्या पहिल्या १३ दिवसांमध्ये मुंबईत हिवतापाचे ४६२, डेंग्यूचे ३१७, गॅस्ट्रोचे ४२९, तर लेप्टोचे १५१ रुग्ण सापडले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ाच्या तुलनेत दुसऱ्या आठवडय़ात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याच वेळी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ात स्वाइन फ्लू, काविळ आणि चिकनगुनियाचे अनुक्रमे ३४, ९ आणि २ रुग्ण सापडले आहेत.
लेप्टोच्या रुग्णांची संख्या घटली
मुसळधार पाऊस कोसळू लागताच मुंबईतील सखल भागांत पाणी साचून निरनिराळय़ा समस्या भेडसावू लागतात. यामुळे जुलैमध्ये लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. जुलैमध्ये लेप्टोचे ४१३ रुग्ण सापडले होते. मात्र ऑगस्टमधील पहिल्या १३ दिवसांमध्ये लेप्टोच्या रुग्णांची संख्या १५१ झाली. त्यामुळे लेप्टोचा धोका कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पावसाचे पाणी सोसायटीच्या आवारामध्ये टायर, करवंटय़ा, भंगार आदींमध्ये साचते आणि त्यामुळे डेंग्यू व हिवतापाची पैदास होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. हिवताप व डेंग्यूला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तसेच आपल्या परिसरात साचलेले पाणी आतून टाकावे. स्वाइन फ्लूचा त्रास लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक होतो. त्यामुळे लसीकरण करावे. – डॉ. भरत जगियासी, सचिव, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन, मुंबई शाखा