मुंबई : महाविकास आघाडीने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उतरविण्याची तयारी केली असून ऋतुजा लटके यांनी महानगरपालिकेतील आपल्या पदाचा (कार्यकारी सहाय्यक) दोन वेळा राजीनामा दिला असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांनी २ सप्टेंबर रोजी पहिल्यांदा राजीनामा दिला होता. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी पुन्हा राजीनामा दिल्याचे आढळून आले आहे. त्यावरून आता राजकारण रंगले असून राजीनाम्याचा हा घोळ ठाकरे गटाकडून हेतूपुरस्सर होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. आपल्या मर्जीतील उमेदवाराला तिकीट देण्यासाठी हे राजीनाम्याचे नाट्य सुरू असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

हेही वाचा >>> Andheri election : उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल विझवण्याचं काम आम्ही करणार – रामदास आठवले

लटके यांनी दोनदा राजीनामा पत्र दिले आहे. मात्र अशा अटी – शर्तींवर राजीनामा देता येत नाही हे ठाकरे गटाच्या कायदेपंडीतांना माहीत नाही का, असा सवाल भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. माजी कायदामंत्री व शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या जवळचे असलेले ॲड. अनिल परब यांना आपल्या मनातील उमेदवाराला संधी द्यायची असल्यामुळे हे नाटक सुरू असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे. महानगरपालिका नियमांच्या फेऱ्यात राजीनामा अडकवून उगाचच भाजप आणि महानगरपालिका प्रशासनावर खापर फोडण्यात येत आहेत, असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

हेही वाचा >>> मुंबईत रविवारपासून जमावबंदी

दरम्यान, लटके यांचा राजीनामा रखडला आणि त्यांची उमेदवारी धोक्यात आल्यास शिवसेनेने दुसऱ्या उमेदवाराची तयारी ठेवली असल्याचेही खात्रीलायक सूत्रांकडून समजते. यामध्ये परब यांच्या मनात विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्याचा विचार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. महाडेश्वर यांना यापूर्वीही वांद्रे पूर्व येथे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून तिकीट देण्यात आले होते. मात्र त्यावेळी ते पराभूत झाले होते.

राजीनामा देण्याची अट शिथिल करण्यात यावी

लोकाग्रहास्तव मला पोटनिवडणूक लढवावी लागत आहे. पोटनिवडणूक लढवण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलो. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची अट शिथिल करण्यात यावी, असे लटके यांनी २ सप्टेंबर रोजी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी राजीनामा

विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी मी माझ्या पदाचा ३ ऑक्टोबरपासून राजीनामा देत आहे. महानगरपालिकेच्या सेवा नियमावलीनुसार माझी एक महिन्याच्या सूचनापत्राची अट विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे शिथिल करावी, अशी विनंती ऋतुजा लटके यांनी ३ ऑक्टोबर रोजी दिलेल्या राजीनामा पत्रात केली आहे.

Story img Loader