मुंबई : बोरिवली येथे रस्ते विभागामार्फत सुरु असलेली रस्त्यांची कामे प्राधान्याने व जलदगतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच, पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत बोरिवली रेल्वे स्थानक परिसरातील प्रस्तावित कामाचा पहिला टप्पाही पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावा, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवारी दिले. दरम्यान, विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर देत संबंधित ठिकाणी अधिकारी – अभियंत्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
हेही वाचा >>> मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
बोरिवली येथील आर मध्य विभागांतर्गत सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची भूषण गगराणी यांनी गुरुवारी पाहणी केली. त्यानंतर, आर मध्य विभाग कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिकेने हाती घेतलेली काँक्रिटीकरणाची कामे दर्जेदार आणि अत्युच्च गुणवत्तापूर्ण होण्यासाठी अधिकारी व अभियंत्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. तसेच, विकासकामे सुरू असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची प्राधान्याने काळजी घ्यावी, असेही गगराणी यांनी नमूद केले. बोरिवली (पूर्व) भागातील पश्चिम रेल्वे परिसरात पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असलेल्या तक्रारींची दखल घेऊन गगराणी यांनी संबंधित परिसरातही भेट दिली. पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत प्रस्तावित कामांची माहिती घेऊन कामाचा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावा, असेही आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आर मध्य विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेला गोराई जेट्टी मार्ग, रस्ता रुंदीकरण आणि उद्यान विकासकामे, बोरिवली पश्चिम येथे सुरू असलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम उद्यानाचे काम, उद्यानातील अॅथलॅटिक ट्रॅक व इतर सुशोभीकरण कामांचीही गगराणी यांनी पाहणी केली. यावेळी उप आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.