ठाणेकरांना दिवाळीची खरेदी मुक्तपणे करता यावी, या उद्देशाने ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातील मुख्य बाजार पेठेच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक मार्गामध्ये मोठे बदल केले असून या संदर्भात अधिसुचना काढली आहे. येत्या १५ नोव्हेंबपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.
शहरातील मुख्य बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी ठाणेकर मोठय़ा संख्येने येत असल्याने त्याचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतो, असा वाहतूक पोलिसांचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी यंदा दिवाळीनिमित्त मुख्य बाजारपेठेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला असून हा बदल अंमलात आणण्यात आला आहे. येत्या १५ नोव्हेंबपर्यंत सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. जांभळीनाका येथून बाजारपेठेत जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने कोर्टनाका, जांभळीनाका येथून टॉवरनाका मार्गे जातील. खारकर आळी येथून बाजार पेठेत जाणाऱ्या वाहनांना महापालिका व्यायाम शाळा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने महापालिका व्यायाम शाळा, महाजनवाडी हॉल, एनकेटी कॉलेज मार्गे कोर्टनाक्याकडे जातील. ठाणे ट्रेडर्स दुकानाकडून मंहमद अली रोडने जांभळी नाक्याकडे येणाऱ्या वाहनांना बोहरी मशिद येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने ठाणे ट्रेडर्स दुकान, महागिरी मशीद मार्गे जातील. दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह येथून बाजारपेठेत येणाऱ्या वाहनांना अग्निशमन कार्यालय येथे प्रवेश बंद आहे. ही वाहने अग्निशमन कार्यालय, राघोबा शंकर रोड मार्गे जातील. अशोक सिनेमा येथून बाजारपेठेत जाणाऱ्या वाहनांना नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स शॉप येथे प्रवेश बंद आहे.      

Story img Loader