मुंबई : मुंबई महापालिकेने खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते काँक्रीटीकरणाचा महाप्रकल्प हाती घेतला आहे. मात्र या काँक्रीटीकरणामुळे खड्डे कमी झाले का याचे उत्तर येत्या पावसाळ्यातच मिळू शकणार आहे. रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाने वेग घेतल्यामुळे येत्या पावसाळ्यात खड्डे बुजविण्याचा खर्च तब्बल ५० टक्क्यांनी कमी होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी तब्बल १६ हजारांहून अधिक खड्डे बुजवण्यात आले होते व त्यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यंदा खड्डे बुजविण्यासाठी ७९ कोटी रुपये खर्च प्रशासनाला अपेक्षित आहे.
कामे वेगात सुरू
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेवर टीका होते. डांबरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. काँक्रीटच्या रस्त्यावर खड्डे पडत नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेने खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत टप्प्याटप्प्याने रस्ते काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत १२०० किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. सध्या एकाच वेळी मुंबईतील ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे वेगात सुरू आहेत.
खर्चात ५१ टक्के कपात
काँक्रीटीकरणाची कामे सुरू असलेल्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबई महापालिकेला सुमारे दीडशे किमी लांबीच्या रस्त्यावरील खड्डेच बुजवावे लागणार आहेत. रस्ते काँक्रीटीकरणाची कामे जसजशी पूर्ण होत आहेत, तसतसा खड्डे भरणीचा खर्च आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यंदा पालिकेने खड्डे भरण्यासाठी निविदा मागवण्यापूर्वी अंदाजित खर्चाचा आढावा घेतला. गेल्यावर्षी १५५ कोटी रुपये खर्च खड्डे भरण्यासाठी झाला होता. यात यावेळी सुमारे ५१ टक्के कपात होईल, असा विश्वास पालिका प्रशासने व्यक्त केला आहे.
हे खड्डे पालिकेचे
खड्डे भरण्याच्या कामासाठी ९ मीटरपेक्षा जास्त रुंद रस्ते, ६ ते ९ मीटर रुंदीचे रस्ते आणि ६ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते, तसेच सिमेंट काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्याच्या बाजूच्या डांबरी पट्ट्या, पूर्व आणि पश्चिम दृतगती मार्ग आणि दृतगती मार्गालगतचे सेवा रस्ते यांच्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पालिका प्रशासन करते. तर ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत त्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी ही कंत्राटदाराची असते.
गेल्या पावसाळ्यात आधीच्या पावसाळ्याच्या तुलनेत ३३ टक्के कमी खर्च झाला होता. यंदा हा खर्च ५१ टक्क्यांनी कमी होईल. तर पुढच्या वर्षी हा खर्च आणखी कमी होईल. अभिजीत बांगर, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त
अंदाजित खर्च
नऊ मीटरपेक्षा अधिक रुंद रस्ते – ४९ कोटी
नऊ मीटरपेक्षा कमी रुंद रस्ते – २७ कोटी
सहा मीटरपेक्षा लहान रस्ते – ३ कोटी
एकूण खर्च – ७९ कोटी
मुंबईत एकूण २०५० किमी लांबीचे रस्ते मुंबई महापालिकेच्या आखत्यारीत येतात. त्यापैकी गेल्या काही वर्षात एकूण १३३३ किमी म्हणजेच ६५ टक्के रस्त्याचे काँक्रिटिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांच्या काँक्रिटिकरणाची कामे पालिकेने दोन टप्प्यात हाती घेतली आहे. त्यापैकी काही कामे आता सुरु आहेत. मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते) तर दुसऱया टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत.