मुंबई : सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटदारांना ३१ मे ची अंतिम मुदत दिली आहे. तोपर्यंत येत्या ७० दिवसात ही कामे पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा, रस्तानिहाय काम पूर्ण करण्याची तारीख निश्चित करा असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाला दिले आहेत. तसेच रस्तेकामे सुरू असताना वरिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी आकस्मित भेट (सरप्राईज व्हिजिट) द्यावी, अधिक गती आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करावे, काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांवर खोदकामास पूर्णपणे बंदी घालावी, असे निर्देशदेखील गगराणी यांनी दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महानगरपालिका मुख्यालयात रस्ते व वाहतूक विभागाच्या अभियंत्यांची मंगळवारी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी याबाबतचे आदेश दिले. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह उप आयुक्त शशांक भोरे उपस्थित होते.

यावेळी आयुक्त म्हणाले, ज्या रस्त्यांची कामे विहित कालावधीत काम पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत त्यांची कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता यांनी बैठकीत रस्तेनिहाय चर्चा केली. अभियंत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जल अभियंता, मलनिःसारण प्रकल्प या विभागाच्या वाहिन्या, इतर प्राधिकरण, उपयोगिता संस्थांच्या वाहिन्या यांमुळे काही प्रमाणात रस्ते कामांना विलंब होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी हे विभाग, उपयोगिता संस्था यांना कामे पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात यावा व रस्ता उर्वरित कालावधीत पूर्ण होईल, याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेश देण्यात आले.

रात्रीच्यावेळी आकस्मिक भेटी द्याव्या….

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, वरिष्ठ अभियंत्यांनी रस्ते कामांना भेट देवून आकस्मिक पाहणी करावी. विशेषतः कामे सुरु असताना रात्रीच्यावेळी भेटी द्याव्यात. रेडीमिक्स काँक्रिट प्लांट, प्रत्यक्ष कार्यस्थळ यांना भेटी देवून निरीक्षणे नोंदवावीत. पूर्ण झालेल्या काँक्रिट रस्त्यांवर खोदकामास मनाई आहे, याबाबत मध्यवर्ती संस्था आणि विभाग कार्यालय यांनी दक्षता घ्यावी. बांधणी पूर्ण झालेल्या रस्त्यांवर कोणत्याही परिस्थितीत खोदकामास परवानगी दिली जाणार नाही, असे गगराणी यांनी नमूद केले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर म्हणाले, काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झालेल्या रस्त्यांना थर्मोप्लास्ट, झेब्रा क्रॉसिंग, कॅट आईज, चौकांमध्ये पिवळ्या थर्मोप्लास्ट रंगाचे ग्रीड बसविणे इत्यादी कामे पूर्ण करावीत. जेणेकरुन हे रस्ते खुले करता येतील. ७०१ किलोमीटरचे रस्ते हे प्रकल्प रस्ते आहेत. पावसाळ्यापूर्वी कॉंक्रिटीकरण पूर्ण होणार नाही अशा रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते भरण्याची जबाबदारी प्रकल्प कंत्राटदाराची आहे. त्यासाठी आतापासूनच कंत्राटदारांनी मास्टिक कुकर आदी संयंत्रासह मनुष्यबळाची जुळवाजुळव करावी. पाऊस सुरु होण्यापूर्वी रस्ते वाहतूकयोग्य असावेत, असेही आदेश बांगर यांनी दिले.