मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे वेगात सुरू असून रस्ते कामांसोबतच उपयोगिता वाहिन्यांची कामेही करण्यात येत आहेत. रस्ते विकास झाल्यानंतर खोदकाम, चर करायला तात्काळ प्रभागाने मनाई करावी, त्याचप्रमाणे काँक्रिटीकरणासाठी नव्याने रस्ते खोदकाम करू नये, असे स्पष्ट निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.
मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते) तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. टप्पा १ मधील ७५ टक्के कामे आणि टप्पा २ मधील ५० टक्के कामे ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांचा अलीकडेच भूषण गगराणी यांनी आढावा घेतला. अधिकारी, कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन रस्ते कामांना अधिक गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये, यासाठी २२ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणत्याही नवीन रस्त्यांचे खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व रस्ते कामे व त्या संबंधित कामे ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले.
सर्व परिमंडळ उप आयुक्त, विभागीय सहायक आयुक्त, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक), प्रमुख अभियंता (पूल), प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या), जल अभियंता, नगर अभियंता, प्रमुख अभियंता (मलनिस्सारण प्रचालन), प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प), प्रमुख अभियंता (विकास नियोजन) आदी खात्यांनी या निर्देशांचे पालन करावे, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.