मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला असून आझाद मैदानावर गुरुवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्याला अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने आझाद मैदान व आसपासच्या परिसरात जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्याला येणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटसमोरच्या मार्गाने आझाद मैदानात प्रवेश करणार आहेत. मान्यवरांच्या वाहनांच्या मार्गात अडथळा बनणारा महात्मा गांधी मार्गावर दोन ठिकाणी रस्ते दुभाजक जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले आहेत. मात्र, दुभाजकांच्या तोडकामामुळे सामान्य नागरिकांकडून टीका होऊ लागली आहे.
महायुती सरकारचा शपथविधी गुरुवार, ५ डिसेंबर रोजी मुंबई महानगरपालिका मार्गावरील आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला पंतप्रधान, राज्यपालांसह विविध मंत्री, साधुसंत आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच, इतर विशेष महत्वाच्या व्यक्तींनाही या सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी आझाद मैदान व आसपासच्या परिसरात प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या रस्त्यांची डागडुजी, वाहतूक चिन्हे व रेषा यांची रंगरंगोटी, दुभाजकांची रंगरंगोटी, पाणीपुरवठा, शौचालये आदी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. तसेच मैदान परिसरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्याची छाटणीही करण्यात आली आहे. मैदानातील कचरा आणि राडारोडा हटवणे, अतिक्रमण निर्मूलन आदी कामांनाही पालिका प्रशासनाने वेग दिला आहे. या सोहळ्यानिमित्ताने वाहतुकीचे मार्गाही बदलण्यात आले आहेत. दरम्यान, सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या वाहनांचा मार्ग वेगवान व सुकर व्हावा, या हेतूने फॅशन स्ट्रीटसमोरच्या मार्गावरील रस्ता दुभाजक दोन ठिकाणी तोडण्यात आले आहेत.
रस्ते दुभाजकांचे तोडकाम झाल्यांनतर या ठिकाणी रस्ता रोधक उभारण्यात येणार आहे. तसेच, शपथविधी सोहळा झाल्यांनतर दुसऱ्या दिवशी तातडीने दुभाजकांचे बांधकाम पुन्हा हाती घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या ए विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.