इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : कचऱ्यात टाकलेल्या, वाया गेलेल्या किंवा जप्त केलेल्या प्लास्टिकचा वापर रस्ते बांधणीत करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने घेतला होता, मात्र आता हा प्रयोग पालिकेने गुंडाळला आहे. प्लास्टिकचे वर्गीकरण करणे, रस्ते बांधणीसाठी ठरावीक दर्जाचे प्लास्टिक निवडणे याकरिता यंत्रणा उभारणे अवघड असल्यामुळे प्लास्टिकचा वापर करण्याचा प्रयोग कागदावरच राहिला आहे.
प्लास्टिकच्या पिशव्या, एकदाच वापरून फेकून दिले जाणारे प्लास्टिक यांचा बेसुमार वापर वाढल्यामुळे प्लास्टिक बंदीची मागणी वाढू लागली. कचऱ्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक आढळू लागले, समुद्र प्रदूषित होऊ लागला, पर्जन्य जलवाहिन्या तुंबू लागल्या, त्यामुळे प्लास्टिकच्या वापरावर र्निबध आणण्याची मागणी वाढली होती. परिणामी, राज्य सरकारने प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावर र्निबध आणले.
जून २०१८ पासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली. त्या वेळी मोठय़ा प्रमाणावर जप्त केलेले प्लास्टिक पालिकेच्या गोदामात पडून होते. त्याच दरम्यान, प्लास्टिकचा वापर रस्ते बांधणीत करण्याचा पर्यायही पुढे येऊ लागला. काही शहरांमध्ये असे प्रयोग झालेले असल्यामुळे मुंबईतही रस्ते बांधणीत प्लास्टिक वापरण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र अजून तरी रस्ते बांधणीत प्लास्टिकचा वापर सुरू झालेला नाही.
राज्य सरकारच्या आदेशानुसार एकदा वापरून फेकून दिले जाणारे प्लास्टिकचे चमचे, प्लेट्स, ग्लास, स्ट्रॉ, प्लास्टिक कंटेनर, तसेच सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जप्त केलेल्या व फेकून दिलेल्या प्लास्टिकचा वापर रस्ते बांधणीत करावा असा विचार गेल्या काही वर्षांत पुढे येऊ लागला होता. पालिकेतर्फे रस्ते बांधणीसाठी दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर निधी खर्च केला जातो. मात्र तरीही दरवर्षी पावसाळय़ात रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे रस्ते बांधणीत प्लास्टिक वापरण्याचा प्रयोग करण्यात येणार होता. तसेच खड्डे भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोल्डमिक्स आणि हॉटमिक्समध्येही प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार सुरू होता.
माजी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या कार्यकाळात कोल्डमिक्समध्ये प्लास्टिक वापरता येईल का, नक्की किती टक्के प्लास्टिक वापरता येईल हे ठरवण्यासाठी तांत्रिक सल्लागार समितीकडे प्रस्तावही पाठवण्यात आला होता. मात्र त्याबाबतही पुढे काहीही झालेले नाही. दरम्यान, इंडियन रोड काँग्रेसच्या विशिष्ट नियमावलीमधील मार्गदर्शक तत्त्वानुसार प्लास्टिक पिशव्यांचा चुरा ठरावीक प्रमाणात डांबराच्या मिश्रणात वापरला जातो. मात्र त्याकरिता ठरावीक दर्जाच्या प्लास्टिकचाच वापर करावा लागतो. त्याकरिता वाया गेलेल्या किंवा कचऱ्यात फेकून दिलेल्या प्लास्टिकचा वापर करण्यापूर्वी त्याचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. ही सगळी यंत्रणा उभारणे अवघड असल्यामुळे रस्ते बांधणीत प्लास्टिकचा वापर करण्यास अद्याप सुरुवात केली नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
प्लास्टिकचा वापर करून रस्ते तयार करणे हे तांत्रिकदृष्टय़ा शक्य आहे. बंगलोर सारख्या ठिकाणी असे प्रयोग झाले आहेत. मात्र प्लास्टिकचे वर्गीकरण, त्याचे लहान लहान तुकडे करणे, त्याचा ठरावीक प्रमाणात वापर करणे, निविदा प्रक्रियेत त्या अटीचा समावेश करणे अशी सगळी यंत्रणा उभारावी लागणार असल्यामुळे हा प्रयोग प्रत्यक्षात आलेला नसल्याचेही अधिकाऱ्यांनी कबूल केले.