शालेय अभ्यासक्रमात ‘रस्ता सुरक्षा’ या विषयाचा समावेश कसा करता येईल, याचा सविस्तर विचार शासनस्तरावर सुरू असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावासोबत अन्य प्रस्तावांचाही विचार करण्यात येत असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
ठाणे वाहतूक पोलीस आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप कार्यक्रम बुधवारी सायंकाळी पोलीस परेड मैदानात पार पडला. या कार्यक्रमानंतर तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रस्ता सुरक्षेविषयी विद्यार्थ्यांना माहिती असेल तर ते भविष्यात वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करतील. यामुळेच शालेय अभ्यासक्रमात ‘रस्ता सुरक्षा’ या विषयाचा समावेश कसा करता येईल, याचा सविस्तर विचार शासनस्तरावर सुरू आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल, याचा विचार सुरू असून त्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रस्तावासोबत अन्य दोन ते तीन प्रस्तावांची चाचपणी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच दहावी आणि बारावी परिक्षेतील विद्यार्थ्यांना शांततेत पेपर सोडवता यावा म्हणून दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना घराजवळचे परिक्षा केंद्र देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून यंदा उशीर झाल्याने पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा निर्णय लागू होणार आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला अभिनेता रझा मुराद, परवीन डबास, आदेश बांदेकर, अभिनेत्री तनुश्री दत्ता, पालकमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस आयुक्त विजय कांबळे, सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण आणि पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर आदी उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप कार्यक्रमात व्यासपीठावर बोलत असताना विनोद तावडे अचानक व्यासपीठावरून खाली उतरले आणि मैदानात बसलेल्या विद्यार्थ्यांच्या दिशेने धावत सुटले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आणि वाहतूक नियमांविषयी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले.