शाळाबाह्य़ मुलांसाठी मुंबईत     तरुणाईची खास चळवळ
आज शाळेचा पहिला दिवस. दप्तर, डबा, पाण्याची बाटली, छत्री असा सगळा जामानिमा सांभाळून घरातून निघालेली बच्चेकंपनी आता सर्वत्र दिसू लागेल. वरळीचे सिद्धार्थ नगर, धारावीच्या गल्ल्या येथे मात्र एव्हाना एक वेगळेच नाटय़ रंगू लागले असेल. सावकाराच्या कर्जामुळे रस्त्यावर आलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची किंवा दारूच्या व्यसनापायी उद्ध्वस्त झालेला संसाराची कहाणी पथनाटय़ातून मांडताना २०-२२ वर्षांची तरुण मंडळी रंगून गेली असतील. शाळा सुरू होण्याच्या तोंडावरच ही पथनाटय़े गरीब वस्त्यांमधून रंगवण्याचे कारण? कारण एकच, शाळा अध्र्यावर सोडावी लागल्याने आपल्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला तसा तो इतरांचा होऊ नये. या तरुणांनी आपले आयुष्य वेळीच सावरले. अशिक्षणाने अंधारलेला त्यांचा मार्ग रात्रशाळेने उजळवून टाकून त्यांना ‘मार्गस्थ’ केले. हाच मार्ग इतरांनीही धरावा, म्हणून आता ही मुले पुढे आली आहेत.
‘मासूम’ या रात्रशाळांना उभारी देण्याचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ही तरुण मंडळी आपल्या मागच्यांना हात देण्यासाठी सरसावली आहेत. संस्थेने यंदा शाळबाह्य़ विद्यार्थ्यांच्या शाळानोंदणीसाठी अभियान राबवायचे ठरविले आहे. अध्र्यावर शिक्षण सुटलेल्यांना पथनाटय़ातून प्रोत्साहन देणे, शाळाबाह्य़ मुलांची माहिती जमा करणे, त्यांनी शाळेत जावे यासाठी पाठपुरावा करणे असे या अभियानाचे स्वरूप असल्याचे संस्थेच्या संस्थापक निकिता केतकर यांनी सांगितले. या कामात संस्थेला मदत होते ती रात्रशाळेतून दहावी होऊन आयुष्य सावरू पाहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची. आयटीआय, अकरावी-बारावीचे शिक्षण घेतानाच नोकरी करणारी ही मुले स्वयंस्फूर्तीने यात सामील झालीत, हे विशेष. पथनाटय़ात सहभागी होणारी मुले ही आमची ‘रोल मॉडेल’ आहेत, असे निकिता सांगतात.
मूळचा कोल्हापूरच्या शाहूवाडीचा पण, वडिलांच्या अपघातामुळे नववीत शिक्षण सोडून मुंबईला रोजीरोटीच्या शोधात आलेला २१ वर्षांचा गोरख लाड हा अशाच विद्यार्थ्यांपैकी एक. अडीच वर्षांनी गोरखने रात्रशाळेत प्रवेश घेऊन दहावीची परीक्षा दिली. मासूमच्या मदतीने संगणकाचे प्रशिक्षण घेतले. आता तो करी रोडच्या सहकार नाईट हायस्कूलमध्ये बारावीला आहे. गोरखचे महाविद्यालयही १७ जूनला सुरू होत आहे, पण पटनोंदणी अभियानासाठी त्याने आपल्या प्राचार्याकडून आठवडाभराची सुट्टी मागून घेतली आहे.
२१ वर्षांचा किरण यादव याच प्रेरणेने अभियानात सहभागी झालाय. साताऱ्यातील एका गावात किरणच्या कुटुंबीयांची मोठी शेती आहे, पण वडिलांच्या व्यसनापायी ती नीट कसली जात नसल्याने घरात अठराविश्वदारिद्रय़. म्हणून आठवीला शाळा सोडून किरणला मुंबईचा रस्ता धरावा लागला. कॅण्टीनमध्ये नोकरी करत त्याने वरळीच्या जांबोरी मैदानातील उत्कर्ष नाइट स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आपल्यासारखी गरीब मुलं व्यसनाच्या नादी लागू नयेत म्हणून त्यांनी शाळेत गेलं पाहिजे, असं किरण पथनाटय़ातून शिक्षकाची भूमिका वठवताना सांगतो.
रात्रशाळांमधून शिकणाऱ्या या मुलांनी आता ‘नाइट स्कूल अ‍ॅल्युमनाय असोसिएशन’ काढण्याचं ठरविले आहे. या संस्थेच्या माध्यमातून रात्रशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट असणार आहे. सरकारी अनास्थेपोटी दुरवस्थेत असलेल्या रात्रशाळांनाही या प्रयत्नांमुळे थोडीफार संजीवनी नक्कीच मिळेल. सामाजिक उत्तरदायित्व याहून आणखी वेगळे ते काय असते?