मुंबई : मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून मुंबईमधील मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पूर्व मुक्त मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू होती. याशिवाय ठिकठिकाणे वाहने व बस बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता.
मुंबईत जोरदार पावसामुळे शुक्रवारीही जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला असून पावसामुळे पूर्व मुक्त मार्गावर दक्षिण वाहिनीवरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. याशिवाय पूर्व मुक्त मार्गावर पोल क्रमांक २६० ते २८० दरम्यान पाणी साचले होते. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे बस बंद पडल्यामुळे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. अंधेरी सब-वे येथे पाणी साचल्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तेथील वाहतूक गोखले पुलावरून वळवण्यात आली. तसेच डी. एन. नगर येथेही पाणी साचल्यामुळे वाहनचालक एस.व्ही. रोड ते गोखले पुल, तसेच उत्तरेकडील वाहतूक ठाकरे पुलावरून होत आहे.
हेही वाचा – मुंबईत पावसाने जोर धरला, पहाटेपासून अनेक भागांत संततधार
पार्ले जंक्शन येथे मोटरगाडीला आग लागल्यामुळे तेथील दक्षिण वाहिनीवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.