मुंबई : पालिका प्रशासनातर्फे मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामातील दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ते वाहतूकयोग्य असावेत. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा, योग्य ठिकाणी पुनर्पृष्ठीकरण करावे. पुनर्पृष्ठीकरण करताना सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच येत्या ७ जूनपूर्वी हे रस्ते पूर्णपणे वाहतूकयोग्य झाले पाहिजेत, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
मुंबई महानगरात ठिकठिकाणी रस्ते बांधणी व दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. बांगर यांनी शुक्रवारी पूर्व द्रुतगती महामार्गावरील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्ते दुरुस्ती कामांची पाहणी केली. चेंबूर पूर्व येथील के.बी. गायकवाड नगर, कुर्ला येथील राहुल नगर, घाटकोपर येथील छेडा नगर, पंत नगर जंक्शन, जोगेश्वरी – विक्रोळी जोड रस्ता जंक्शन आणि घाटकोपर पूर्वस्थित नालंदा नगरमधील रस्त्यांच्या कामांची पाहणी करून त्यांनी आढावा घेतला.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील खड्डे बुजविण्याबरोबरच पुनर्पृष्ठीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे आढळता कामा नयेत. त्यामुळे दिसेल तो खड्डा तात्काळ बुजवावा, तसेच रस्त्यांच्या कडेला असलेला राडारोडा तात्काळ हटवावा. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्त्यांच्या डागडुजीची कामे वाहतुकीस अडथळा न येता अहोरात्र वेगाने करून ७ जूनपूर्वी पूर्ण झालीच पाहिजे, असे आदेश बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
हेही वाचा : मुंबई: ब्लाॅक कालावधीत टप्पा वाहतूक
गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही
मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही. सध्या सुरू असलेली कामे ७ जूनपूर्वी पूर्ण करावीत. अन्यथा कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल. रस्ते व वाहतूक विभागातील अभियंत्यावर योग्य पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी राहील, असे आदेश बांगर यांनी दिले.