लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली असून ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहिमेअंतर्गत शनिवारी दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. या कार्यवाहीत फेरीवाल्यांकडून साधनसामग्री जप्त करण्यात आली. तसेच, अनधिकृत वीज जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे दादर परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून नागरिक, पादचारी, प्रवाशांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईचे कौतुक केले आहे.

नागरिकांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणारे फेरीवाले, पथारीवाले तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

आणखी वाचा-मुंबईत सोमवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज

दादर हे मुंबईमधील सर्वात वर्दळीचे व एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दादर स्थानक मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य व पश्चिम या दोन्ही मार्गांवर आहे. उपनगरीय रेल्वेखेरीज पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेवरील अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील दादरहून सुटतात. त्यामुळे या भागात रेल्वे प्रवाशांची दररोज मोठी वर्दळ असते. याखेरीज दाट लोकवस्तीचा परिसर अशीदेखील दादरची ओळख आहे. परिणामी, या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. रस्ते, पदपथांवर फेरीवाल्यांची संख्या वाढल्याची, तसेच त्यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबतच्या तक्रारी महानगरपालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.

आणखी वाचा-पावसाळ्यातही रिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारणे सुरूच

या तक्रारींची दखल घेत जी उत्तर विभागाच्यावतीने शनिवारी दिवसभर दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. सेनापती बापट मार्ग, रानडे मार्ग, डी’सिल्वा मार्ग या रस्त्यांवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करून अनधिकृत फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. या अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यवसायासाठी अनधिकृतपणे वीज जोडण्या घेतल्याचे देखील निदर्शनास आले आणि त्या अनधिकृत वीज जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोहीम सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली.