मुंबई : गेल्या आठवड्यातील जोरदार पावसामुळे मुंबईतील सखलभाग जलमय झाल्यामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. परिणामी, वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे हाल झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्व उपनागरतील मानखुर्द परिसरातील महाराष्ट्र नगरमध्ये सध्या मेट्रो कारशेडचे काम सुरू आहे. मुंबईत बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या भागात पावसाचे पाणी साचले होते. परिणामी, या परिसरातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. महाराष्ट्र नगराला जोडणाऱ्या भुयारी मार्गात चार ते पाच फूट खड्डे पडले असून या खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा – उत्सवमहिमा… गंधभारल्या फुलबाजाराला महागाईचा रंग

शीव – पनवेल महामार्गावरील मानखुर्द उड्डाणपुलावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवात हे खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसानंतर हा रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. अशीच परिस्थिती चेंबूरमधील कलेक्टर कॉलनी परिसरात आहे. येथील रस्ते अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत होते. पालिकेने खडी आणि माती टाकून तात्पुरती मलमपट्टी केली होती. मात्र मुसळधार पावसानंतर रस्त्यावरील खडी वाहून गेल्याने रस्ता पुन्हा खड्डेमय झाला. चेंबूरच्या कॅम्प, सिंधी सोसायटी, लालडोंगर परिसरातही अशीच स्थिती आहे.

चेंबूर शिवडी मार्गावरही मुख्य रस्त्यालगतच्या डांबरी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावरील सुमन नगर जंक्शनपासून काही अंतरावरील रस्त्याच्या मधोमध खड्ड्यांमुळे चाळण झाली असून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रियदर्शनी परिसरातील जोड रस्त्यावर खडीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची भीती आहे.

हेही वाचा – राज्यात आठ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता! एमबीबीएसच्या ८०० जागा वाढल्या…

चुनाभट्टी परीसरातील अशोक नगर ते चुनाभट्टी फाटक चौखाबा रोडवरही खड्डे पडले आहेत. बेस्टच्या कुर्ला आगाराबाहेरील रस्त्यांवरील खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजविण्यात आले होते. मात्र सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या टर्मिनसपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनसबाहेरील रस्त्याची तर पूर्णपणे चाळण झाली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दररोज हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याच्या दूरवस्थेमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. घाटकोपरमधील गारोडिया नगर, पंतनगर सर्कल, मुलुंडच्या नवघर परिसरातील रस्ता क्रमांक १ आणि २, गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातील बैंगनवाडी आणि रफिक नगर परिसरातील अनेक रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roads in bad condition due to heavy rain pits again due to drifting of pebbles in watery areas mumbai print news ssb