मुंबईमधील हागणदारी होणाऱ्या भागात ५०० मीटरच्या परिसरात सर्वत्र शौचालये उपलब्ध करण्यात आली असून मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. इतकेच नव्हे तर महापौर आणि पालिका आयुक्तांनी नगरविकास खाते आणि ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या राज्याच्या संचालकांना मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचे कळविले आहे. असे असले तरी उघडय़ावर प्रात:विधी उरकणाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात पालिका अयशस्वी ठरली असताना मुंबई हागणदारी मुक्त झाल्याचा दावा करुन पालिका प्रशासन आणि महापौर मोकळे झाले आहेत.
केंद्र सरकारने २ ऑक्टोबर २०१४ रोजी ‘स्वच्छ भारत’ अभियान सुरू केले असून ऑक्टोबर २०१४ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईमधील पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये ११८ ठिकाणी उघडय़ावरच प्रात:विधी उरकण्यात येत असल्याचे आढळून आले होते. ‘स्वच्छ भारत’ अभियानातील निकषानुसार हागणदारी होणाऱ्या भागात ५०० मीटरच्या परिसरात सर्वत्र शौचालये उपलब्ध करुन देणे बंधनकारक असून पालिकेने अशा भागात सौचालये उपलब्ध करुन दिली आहेत. जेथे शौचालयांचे बांधकाम सुरू आहे, तेथे फिरती शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यामुळे हे सर्व विभाग हागणदारी मुक्त झाले आहेत, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या रुळालगत होणारी हागणदारी थांबविण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी रेल्वेच्या दोन्ही विभागांच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून संबंधित भागात आवश्यक असलेली शौचालये उभारण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. मुंबईत आतापर्यंत १,६४१ आसनांची नवी शौचालये बांधण्यात आली असून ३,८७७ आसनांच्या शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. यापूर्वी पालिका क्षेत्रात ८,४१५ शौचालयांमध्ये सुमारे ८० हजार आसने आहेत. शौचालयांचे बांधकाम सुरू असलेल्या अथवा बांधकाम करता न आलेल्या ठिकाणी ८०० आसनांची फिरती शौचालये उपलब्ध करण्यात आलीोहेत. संबंधितांनी शौचालयाचा वापर करावा यासाठी पालिकेकडून प्रबोधन मोहीम राबविण्यात येत आहे. त्यचबरोबर जनजागृतीसाठी होर्डिग, पोस्टर, बॅनर्स लावण्यात आले आहेत, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. तसेच हागणदारी परिसरात नियुक्त केलेल्या क्लिन अप मार्शलच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.पालिकेने हागणदारी भागात उपलब्ध केलेली फिरती शौचालये आणि तेथील नागरिकांची संख्या लक्षात घेत पालिकेची सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे फिरते शौचालय असूनही उघडय़ावरच प्रात:विधी उरकण्याची वेळ येत आहे. असे असताना मुंबई हागणदारी मुक्त झाल्याचा दावा पालिकेने केला आहे.