मुंबई : अकराव्या मजल्यावरील शौचालयाच्या खिडकीतून आत शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने एक कोटीची खंडणी मागत केलेल्या हल्ल्यात अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी झाला. हल्लेखोराने सैफवर सहा वार केले असून त्यापैकी दोन जखमा गंभीरआहेत. हल्ला केल्यानंतर पळून गेलेल्या या तरुणाचा शोध सुरू आहे. या हल्ल्यात सैफसह त्याच्या घरातील दोन महिला कर्मचारीही जखमी झाल्या आहेत.
हल्लेखोराची ओळख पटली असून याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांनी १० पथके तयार केली आहे. सैफ अली खानच्या निवासस्थानी चोरीच्या उद्देशाने एका व्यक्ती शिरली होती. त्याने सैफवर हल्ला केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त(परिमंडळ-९) दीक्षित गेडाम यांनी दिली. सैफच्या घरी गेल्या काही दिवसांपासून फरशी पॉलिश करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी नियमित येणाऱ्या कामगारांची चौकशी करण्यात आली. आतापर्यंत या गुन्ह्यामागे चोरी हाच संशयास्पद हेतू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, न्यायवैद्याक तज्ज्ञांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली आहे. आरोपीला पहिल्यांदा पाहणारी महिला कर्मचारी लिमा यांची वांद्रे पोलिसांनी चौकशी करून त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>> चित्रपटसृष्टीतील कलाकार हल्लेखोर, खंडणीखोरांच्या निशाण्यावर?
मुलाच्या खोलीतून प्रवेश
एका खोलीत सैफ व करीना राहतात. दुसऱ्या खोलीत तैमुर व त्याची आया लिना व तिसऱ्या खोलीत सैफचा धाकटा मुलगा जहांगीर उर्फ जयबाबा, एक नर्स लिमा व आया जुनु राहतात. आगीपासून संरक्षण करण्यासाठी इमारतीत असलेल्या जिन्यावरून आरोपी चढून आला व सैफचा धाकटा मुलगा जहांगिरच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीतून घरात शिरला. त्यावेळी घरात शिरलेल्या अनोळखी व्यक्तीला पाहून सैफ अली खानच्या घरात काम करणारी एरियामा फिलिप्स ऊर्फ लिमा या सैफचा मुलगा जहांगीर याला उचण्यासाठी धावल्या असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी सैफ अली खान व करीना दोघेही तेथे पोहोचले. त्यावेळी सैफवर हल्ला केला. तैमुरची आया लिमा या देखील मध्ये पडल्या. आरोपींच्या हल्यात त्याही जखमी झाल्या आहेत.
एक कोटींची मागणी
सैफ अली खानचा मुलगा जहांगीरच्या खोलीत चोरटा शिरला. त्या खोलीत दोन महिला कर्मचारी झोपल्या होत्या. यातील एका महिला कर्मचाऱ्याला त्याने आधी शांत राहण्यास सांगून धमकावले. तसेच १ कोटी रुपये मागितले. त्यावेळी लिमा या सैफच्या लहान मुलाला घेण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला.
सहा जखमा, दोन गंभीर
ही घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. सैफ अली खानला एकूण सहा जखमा झाल्या आहेत. दोन गंभीर स्वरूपाच्या आहेत. प्रामुख्याने त्याच्या पाठीवर, एक मणक्याजवळ असलेली जखम गंभीर आहे. त्याच्या मानेवर एक किरकोळ जखम आहे, तर उर्वरित जखम किरकोळ स्वरूपाची आहे. सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. हल्ल्यावेळी सैफच्या घरात पत्नी करीना कपूर, दोन मुलगे व तीन महिला कर्मचारी असे सात जण होते.