विलेपार्ले येथे एकाच दिवसात सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या असून दरोडय़ाचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणात सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रवीणा ठोंबरे (२९) ही सहार रोडवरून आपल्या मित्रासमवेत शुक्रवारी संध्याकाळी मोटरसायकलवरून घरी जात होती. साडेसातच्या सुमारास एका आरोपीने त्यांची मोटरसायकल अडविली. त्याने प्रवीणाच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी लुटून पळ काढला. याप्रकरणी आरोपी मारुती कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. सोनसाखळी लुटण्याची दुसरी घटना सुभाष रोड-तेजपाल रोड जंक्शनवर घडली. संध्याकाळी सवापाचच्या सुमारास सुनीता पांचाळ (४९) या रस्त्यावरून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन आरोपींनी त्यांना अडवले. चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील २२ गॅ्रम वजनाची सोन्याची साखळी घेऊन ते पसार झाले. दरम्यान, विलेपार्ले पूर्व येथील अग्रवाल मार्केटमधील ‘जय सर्वमंगल ज्वेलर्स’ या दुकानावर सहा अज्ञात इसमांनी शुक्रवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी आरडाओरड केल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. मात्र दुकानाचा दरवाजा तोडणाऱ्या लुटारूंनी सुरक्षारक्षक कपिलदेव दुबे (४२) याला मारहाण केली. मात्र यामुळे गोंधळ उडाला आणि लुटारू पळून गेले. जखमी दुबेला व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader