डिसेंबर २०२१ मध्ये मास्क परिधान केलेल्या दोन सशस्त्र दरोडेखोरांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दहिसर (पश्चिम) शाखेत दरोडा टाकला होता. हल्लेखोरांनी एका कंत्राटी कर्मचाऱ्याची गोळी झाडून हत्या केली आणि बँकेतून सुमारे २ लाख ७ हजार रुपये चोरले. या घटनेनंतर अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. एक स्निफर डॉग आणि १० वर्षांच्या मुलीच्या मदतीने पोलिसांनी या आरोपींना गजाआड केलं. या दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज दिंडोशी येथील सत्र न्यायालयात प्रलंबित असून त्यावर १ जानेवारी २०२४ रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नेमकी घटना काय?
‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, “२९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास दहिसर रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटरहून कमी अंतरावर असलेल्या गुरुकुल हाऊसिंग सोसायटीच्या तळमजल्यावरील एसबीआय बँकेत दोन पुरुष घुसले. यावेळी बँकेत ‘ग्राहक मित्र’ म्हणून काम करणाऱ्या संदेश गोमणे यांना संशय आल्याने त्यांनी दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका हल्लेखोराने पुढच्याच क्षणात गोमणे यांच्यावर गोळी झाडली. आरोपीनं काळ्या पिशवीत बंदूक लपवून आणली होती.
धर्मेंद्र (वय-२१) आणि त्याचा चुलत भाऊ विकास गुलाबधर यादव (वय-१९) अशी दरोडेखोरांची नावं आहेत. दोघंही उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवाशी असून त्यांनी बँकेतून सुमारे २.७ लाख रुपये लुटले. याप्रकरणी पोलिसांनी तपास करताना ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यामध्ये दोन्ही दरोडेखोर दहिसर पश्चिम आणि पूर्वेला जोडणाऱ्या फूट ओव्हरब्रिजकडे गेल्याचे पोलिसांना आढळून आले.
तसेच दरोडा टाकल्यानंतर एका भावाने पळून जाण्यापूर्वी त्याची चप्पल बँकेच्या आवारात टाकून दिली होती. या चप्पलेच्या आधारे पोलिसांनी स्निफर डॉगच्या मदतीने आरोपी राहत असलेल्या झोपडपट्टीपर्यंत पोहोचले. याचवेळी झोपडपट्टीतील एका १० वर्षीय मुलीने पोलिसांनी संशयिताच्या केलेल्या वर्णनानुसार आरोपी धर्मेंद्रच्या घराचा पत्ता सांगितला. यानंतर पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र आणि विकास दोघांनाही अटक केली. केटरिंग सर्व्हिसमध्ये काम करणार्या धर्मेंद्रने पोलिसांना सांगितलं की, त्याचे वडील शेतकरी असून त्यांनी साडेचार लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हा दरोडा टाकला. याप्रकरणी १ जानेवारी २०२४ रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.