नवीन प्रवेशांना मज्जाव, जुन्या विद्यार्थ्यांना अन्य शाळांचा रस्ता; १८० वर्षे जुन्या शाळेला टाळे लावण्याचा व्यवस्थापनाचाच प्रयत्न
एके काळी तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमाचे धडे देण्यात नामांकीत ठरलेल्या रॉबर्ट मनी टेक्निकल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा भाग असलेली इंग्रजी माध्यमाची शाळाही व्यवस्थापनाच्या हटवादीपणामुळे आता अखेरचे आचके घेत आहे. विशेष म्हणजे, शाळा बंद करण्याच्या कामात शाळेचे व्यवस्थापनच आघाडीवर असून या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्याच वेळी सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे धोरण व्यवस्थापनाने आखले आहे. पटसंख्या कमी असल्याचे दाखवून शाळा बंद करण्याचा यामागे हेतू असल्याचे बोलले जात आहे. व्यवस्थापनाच्या या कारनाम्याला विरोध करणाऱ्या मुख्याध्यापकालाही निलंबित करण्यात आले. या पाश्र्वभूमीवर शाळा वाचवण्यासाठी काही पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन लढा उभारण्याच्या तयारीत आहेत.
ब्रिटिश काळामध्ये मुंबई प्रांतात महत्त्वपूर्ण जबाबदारी पेलणारा इंग्रजी अधिकारी रॉबर्ट मनी यांच्या स्मरणार्थ १८३५ साली ‘रॉबर्ट मनी टेक्नीकल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज’ सुरू करण्यात आले. सुरुवातीला ही शाळा आणि कॉलेज धोबी तलाव येथील एका जागेत भरत होती. त्यानंतर १९०८ मध्ये ही शाळा ग्रॅण्ट रोड येथील विस्तृत जागेत स्थलांतरित करण्यात आली. या शाळेच्या देखण्या इमारतीला पुरातन वास्तू वारसा लाभला आहे. ‘बॉम्बे डाओसिसन ट्रस्ट’ने शाळेच्या व्यवस्थापनाचा कारभार पाहण्यासाठी ‘बॉम्बे डाओसिसन सोसायटी’ची स्थापना केली आणि शाळेची सर्व सूत्रे या सोसायटीच्या ताब्यात देण्यात आली. त्याआधी ही शाळा चर्च मिशनरीच्या देखभालीखाली सुरू होती.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून व्यवस्थापनाच्या निर्णयांमुळेच शाळेला घरघर लागत आहे. २०१२ मध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याचे कारण पुढे करत मराठी माध्यमाची शाळा आणि ज्युनिअर कॉलेजला टाळे ठोकण्यात आले. त्यानंतर शाळेचा काही भाग संस्थेला भाडेपट्टय़ाने देण्यात आला. एके काळी या शाळेच्या मैदानात आसपासच्या परिसरातील मुले खेळण्यासाठी येत होती. परंतु आता मैदानात प्रवेश नाकारण्यात येत असून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. याविरोधात तक्रार करुनही पालिकेने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. आता इंग्रजी माध्यमही पद्धतशीरपणे बंद करण्याचा घाट घालण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत २०१२ मध्ये ३४२ इतकी विद्यार्थी संख्या होती. मात्र आजघडीला या शाळेत इयत्ता सहावी ते दहावीच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या जेमतेम ६० च्या आसपास उरली आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षांतील वार्षिक परीक्षेच्या निकालासोबत विद्यार्थ्यांच्या हातावर शाळेचा दाखला ठेवून त्यांना बाहेरची वाट दाखविण्याचा घाट सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी घातला होता. यामागे शाळा बंद करण्याचा डाव असल्याचे ओळखून मुख्याध्यापिका रेखा गायकवाड यांनी शाळेच्या दाखल्यावर स्वाक्षरी केली नाही. तसेच त्या शाळेत अनुपस्थित राहिल्या. मात्र, हेच कारण पुढे करीत त्यांना निलंबित करण्यात आले. काही विद्यार्थ्यांना तर दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याचेही समजते. शाळा व्यवस्थापनाने प्रगतिपुस्तक देताना त्यावर शाळा कधी सुरू होणार याचा उल्लेख केला नव्हता. त्याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी विचारणा केल्यानंतर नोटीस जारी करीत सहावी ते आठवीचे वर्ग बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. काही समाजबांधवांनी शाळा वाचविण्यासाठी स्थापन केलेल्या ‘ख्रिश्चन रिफॉर्म युनायटेड पीपल असोसिएशन’ने याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर प्रवेश प्रक्रिया बंद करण्यास शिक्षण उपसंचालकांनी मज्जाव केला. मात्र, त्यानंतरही या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत नाही. आता इयत्ता सहावी ते दहावीचे वर्ग शाळेत भरवले जात आहेत. परंतु सहावी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून शुल्क (फी) घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पालक चिंतीत झाले आहेत. शाळेतील काही मंडळींकडून होणाऱ्या त्रासाबद्दल शिक्षकांनी पोलिसात तक्रार केली आहे. परंतु त्याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहे. त्यातच मुख्याध्यापकांना निलंबित केल्यामुळे शिक्षकवर्गामध्येही चलबिचल सुरू झाली आहे.