मुंबई : तनुजा चण्हाण (५२) यांना पाच महिन्यांपासून प्रचंड पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना काविळीसह पित्ताशयातील खड्यांचा गुंतागूंतीचा आजार झाल्याचे व पित्ताशय काढून टाकण्याची गरज असल्याचे निदान झाले. एरवी पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया सर्वसामान्य मानली जाते, मात्र कीर्ती यांना उच्च रक्तदाब आणि इस्चेमिक हृदयविकाराची समस्याही असल्याने त्यांच्याबाबतीत गोष्टी गुंतागूंतीच्या बनल्या होत्या. फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंडचे तज्ञ डॉक्टर व रोबोटिक सर्जन डॉ. जिग्नेश गांधी आणि गॅस्ट्रोएंटेरोलॉस्ट डॉ. सूर्यप्रकाश भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागातील तज्ज्ञांची एक टीम तयार करण्यात आली. या टीमने पित्ताशय काढून टाकण्यासाठी एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलँजिओपँक्रियाटोग्राफी (ईआरसीपी) सह रोबोटिक कोलेसिस्टेक्टोमी पार पाडली. शरीराचा लहानात लहान छेद घेऊन करण्यात येणाऱ्या या शस्त्रक्रियेमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया (अवयव काढून टाकण्यासाठी करण्यात येणारी) व पित्तवाहिनीतील (बेली डक्ट) खड्यांचे निदान करून त्यावर उपचार करण्यासाठी करण्यात येणाऱ्या ईआरसीपी या दोन प्रक्रिया एकत्रितपणे केल्या जातात. आता तनुजा यांची प्रकृत्ती उत्तम असून त्या नियमित कामही करू लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोबोटच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या कोलेसिस्टेक्टटोमीचे रुग्ण लवकर बरा होणे, वेदना कमी होणे, हॉस्पिटलमध्ये कमी काळ वास्तव्य करावा लागतो व हॉस्पिटलचा खर्च कमी होतो. या प्रकरणामध्ये रुग्णाच्या पित्ताशयात खडे झाल्याने त्यांची स्थिती गुंतागूंतीची झाली होती; हे खडे सामायिक पित्तवाहिनीमध्ये पोहोचले होते, त्यामुळे ईआरसीपी करणे आवश्यक बनले. तनुजा यांना हृदयविकार असल्याने त्यांची रक्त पातळ करणारी औषधे सुरू होती आणि हृदयविकाराच्या औषधांचा प्रभाव उतरण्यासाठी टीमला शस्त्रक्रियेपूर्वी तीन दिवस प्रतिक्षा करावी लागली.

हेही वाचा >>> ३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी

रुग्णालयाच्या वैद्यकीय टीमने पित्ताशय काढून टाकण्यासाठी एरवी सरसकट वापरल्या जाणाऱ्या लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेऐवजी रोबोटिक शस्त्रक्रियेचा पर्याय निवडण्याचे ठरविले कारण तनुजा यांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) जास्त होता व त्यांना इतर काही आजार होते. अशा स्थितीत शस्त्रक्रियेमध्ये गुंतागुंती उद्भवू नयेत म्हणून ती कमी वेळेत व अत्यंत अचूकपणे पार पाडणे गरजेचे होते. रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये शरीराचा तुलनेने छोटा छेद घ्यावा लागतो, ज्यामुळे शरीराला कमी धक्का बसतो, कमी रक्तस्त्राव होतो व पारंपरिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत रुग्ण लवकर पूर्ववत होतो. या प्रक्रियेविषयी बोलताना रोबोटिक सर्जन डॉ. जिग्नेश गांधी म्हणाले, “तनुजा यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी आम्ही जनरल अॅनेस्थेशियापासून सुरुवात केली, पण त्यानंतर लगेचच त्यांना व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया (हृदयाचे ठोके वेगाने पडणे)चा त्रास सुरू झाला, व हृदयाच्या ठोक्यांची गती पुन्हा सुरळीत करण्यासाठी एका शॉकची गरज पडली.

हेही वाचा >>> कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार

हृदयाच्या ठोक्यांची गती स्थिर झाल्यानंतर एकाच मांडणीमध्ये कोलेसिस्टेक्टोमी आणि ईआरसीपी पार पाडण्यात आल्या. रोबोटच्या सहाय्याने केलेल्या व सुमारे ३५ मिनिटे चाललेल्या शस्त्रक्रियेच्या पाठोपाठ ईआरसीपी करण्यात आली, ज्याला सुमारे १५ मिनिटे लागली. उच्च धोका असलेल्या रुग्णांवरही रोबोटिक शस्त्रक्रिया सुरक्षितपणे केली जाऊ शकते व वैद्यकीय साहित्यामध्ये असलेल्या उल्लेखाप्रमाणे अशा शस्त्रक्रियेचे अधिक चांगले परिणामही मिळू शकतात ही गोष्ट या शस्त्रक्रियेतून नव्याने सिद्ध झाली.” या आजारात रुग्णाची स्थिती गुंतागूंतीची झाल्याने शस्त्रक्रिया झटपट करणे अत्यंत महत्त्वाचे होते व अशाप्रकारच्या मोठा धोका असलेल्या परिस्थितीमध्येही रोबोटिक शस्त्रक्रिया सुरक्षितपणे व कार्यक्षमतेने पार पाडता येते हे या उदाहरणातून दिसून आले. या शस्त्रक्रियेच्या शरीराचा किमान छेद घेण्याच्या पद्धतीमुळे या प्रक्रियेतून जाणारे रुग्ण तुलनेने लवकर पूर्ववत होतात, त्यांना वेदना कमी होतात व त्यांना हॉस्पिटलमध्ये कमी काळासाठी रहावे लागते. त्यामुळेच आम्ही तनुजा यांना शस्त्रक्रियेनंतर ४८ तासांत घरी पाठवू शकलो.” डॉ. जिग्नेश गांधी म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robotic gallbladder surgery on heart patient in fortis hospital mumbai print news zws