लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जे.जे. रुग्णालयामध्ये प्रथमच बुधवारी यंत्रमानवाद्वारे (रोबोटिक) यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रुग्णालयाचे अधिष्ठाता व शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अजय भांडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली असून पहिल्याच दिवशी तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जे.जे. रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जे.जे. रुग्णालयामध्ये बुधवारी रुग्णालयाचे अधिष्ठाता व शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अजय भांडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयामध्ये पहिल्याच दिवशी रोबोटच्या माध्यमातून तीन जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या. त्यात एक हर्नियावरील फंडोप्लिकेशन तर इनगुइनल हर्निया प्रकरणांवरील दोन शस्त्रक्रिया रोबोटच्या माध्यमातून करण्यात आल्या. त्यात डॉ. गिरीश डी. बक्षी, डॉ. अमोल वाघ, डॉ. वकार अन्सारी, डॉ. कविता जाधव, डॉ. काशिफ अन्सारी आणि डॉ. सुप्रिया भोंडवे यांचा सहभाग होता.

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांना चेन्नईमधील अपोलो रुग्णालयातील रोबोटिक सर्जन डॉ. सुदीप्तो कुमार स्वेन यांनी मार्गदर्शन केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सचिव धीरज कुमार, आयुक्त राजीव निवतकर, आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची दूरदृष्टी व सक्रिय प्रयत्नांमुळे जे.जे. रुग्णालयामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेला प्रारंभ झाल्याचे माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भांडारवार यांनी दिली.

जे.जे. रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाने आतापर्यंत जगभरात अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियामध्ये यश मिळवले आहे. अधिष्ठाता डॉ. अजय भांडारवार यांच्या नेतृत्वाखाली विभागाने अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. जे.जे. रुग्णालयात रोबोटिक सर्जरी सुरू झाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपचार मिळण्यास मदत होणार आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर होणारी गुंतागुंत टळता येणार आहे. रुग्णाचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होणार आहे. जे.जे. रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्यांचा याचा अधिकाधिक लाभ होणार आहे.

कशी होते रोबोट शस्त्रक्रिया

प्रचलित पद्धतीने शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना रुग्णांच्या चारही बाजूने फिरणे शक्य नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र रोबोटमध्ये असलेल्या कॅमेरामुळे शस्त्रक्रिया करताना मानवाच्या शरीरातील प्रत्येक भाग अधिक सूक्ष्मपणे दिसतो. तसेच यंत्रमानवाच्या हाताला असलेला प्रोब हा ३६० अंशामध्ये फिरत असल्याने डॉक्टरांना यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया करणे सोपे जाते.

जे.जे. रुग्णालयामध्ये स्वतंत्र शस्त्रक्रियागृह

जे.जे. रुग्णालयामध्ये रोबोट आणल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर, तंत्रज्ञ व परिचारिका यांना काही महिने प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी रुग्णालयात स्टिम्युलेटरचा वापर करण्यात आला. रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी जे.जे. रुग्णालयात स्वतंत्र शस्त्रक्रियागृह उभे करण्यात आले आहे. रोबोटच्या मदतीने अचूक आणि सखोल पद्धतीने शस्त्रक्रिया करणे शक्य होते. मात्र या पद्धतीने शस्त्रक्रिया करणे खर्चिक असल्याने सर्वसामान्य रुग्णांने ते परवडणारे नसते. मात्र जे.जे. रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा लाभ होणार आहे.