मुंबई : जे.जे. रुग्णालयत येणाऱ्या गरीब रुग्णांवर प्रथमच यंत्रमानवाच्या माध्यमातून अद्ययावत पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नववर्षामध्ये या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया अधिक सहज व सुलभ पद्धतीने पार पाडव्यात यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण आणि काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण हाेताच यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्यासाठी रुग्णालयामध्ये सिम्युलेटरचा वापर केला जात आहे.
खासगी रुग्णालयामध्ये यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्या जातात. यंत्रमानवाच्या मदतीने अचूक आणि सखोल पद्धतीने शस्त्रक्रिया करणे शक्य होते. मात्र या पद्धतीची शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ती परवडणारी नाही. मात्र सर्वसामान्य नागरिकांनाही याचा लाभ व्हावा यासाठी जे.जे. रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जे.जे. रुग्णालयामध्ये यंत्रमानव आणण्यात आला आहे. या यंत्रमानवाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर, तंत्रज्ञ व परिचारिका या प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागामध्ये सध्या डॉक्टर व तंत्रज्ञांचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणासाठी रुग्णाालयामध्ये सिम्युलेटरचा वापर करण्यात येत आहे. डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याबरोबरच यंत्रमानवाच्या वापरासाठी उभारण्यात येत असलेले स्वतंत्र शस्त्रक्रियागृहाचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे प्रशिक्षण व काही तांत्रिक कामे पूर्ण होताच जे.जे. रुग्णालयामध्ये यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात होणार आहे. यंत्रमानवाच्या मदतीने करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना वेदना कमी होतात, कमी रक्तस्त्राव होतो. तसेच रुग्ण लवकर बरा होतो आणि रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो, अशी माहिती शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.
हेही वाचा >>>वांद्रे, निर्मलनगरमधील म्हाडा संक्रमण शिबिरार्थी रस्त्यावर, निर्मलनगरमध्येच घरे देण्याची मागणी
कशी होते यंत्रमानवाची मदत
प्रचलित पद्धतीने शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना रुग्णांच्या चारही बाजूने फिरणे शक्य नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र यंत्रमानवामध्ये असलेले कॅमेरे शस्त्रक्रिया करताना मानवाच्या शरीरातील प्रत्येक भाग अधिक सूक्ष्मपणे दाखवतो. तसेच यंत्रमानवाच्या हाताला असलेला प्रोब ३६० अंशामध्ये फिरत असल्याने डॉक्टरांना यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया करणे सोपे जाते.
यंत्रमानवासाठी ३५ कोटी रुपये खर्च
जे.जे.रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांना अद्ययावत व यंत्रमानवाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेचा लाभ व्हावा यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने यंत्रमानवासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.