पन्नास लाखांच्या खंडणीसाठी कल्याणमधील ठाणकरपाडा येथील रोहन गुचैत या बारा वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी चारही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून मुलाच्या घरापासून हत्या घडल्याच्या ठिकाणापर्यंत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार चौकशीच्या कामासाठी घेण्यात येत आहे, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.
पोलीस कोठडीत असलेल्या चारही आरोपींची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास करण्यासाठी काही महत्त्वाचे धागेदोरे लगेच उघड करणे योग्य होणार नाही. या हत्येमागे खंडणीबरोबर अन्य काही कारणे आहेत का याचाही शोध घेतला जात आहे, असे उपायुक्त जाधव यांनी स्पष्ट केले.
१७ एप्रिलपासून घराबाहेर खेळत असताना रोहन बेपत्ता झाला होता. रविवारी त्याचा मृतदेह बाजार समिती आवाराजवळील नाल्यात सापडला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरावर पाळत
रोहनचे अपहरण केल्यानंतर वडील गुलाबचंद यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. आरोपींनी गुचैत कुटुंबीयांच्या घरावर पाळत ठेवली होती. त्यांच्या घरात पोलिसांची ये-जा सुरू झाल्यामुळे अपहरण करणाऱ्या आरोपींना आपला खंडणीचा डाव यशस्वी होणार नाही याची जाणीव झाल्याने व बाजारपेठ पोलिसांनी हे प्रकरण अतिशय निष्काळजीपणे हाताळल्याने रोहनची हत्या झाल्याची टीका सर्व स्तरांतून होत आहे. धमकीसाठी वापरलेल्या दूरध्वनीचा शोध पोलिसांनी घेतला होता. रोहनच्या घरात नेहमी इलेक्ट्रिकचे काम करणाऱ्या सय्यद शेखबरोबर त्याची ओळख झाली होती. अपहरण करताना रोहनला मोटार सायकलवरून नेण्यात आले होते. हा स्वार सय्यद असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून स्पष्ट झाले आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी गुचैत कुटुंबीयांचे सांत्वन करण्याऐवजी ‘तुमचा रोहन देखणा होता. त्याला कोणीही पळवणारच ना. त्याने पण मोठेपणी एखाद्या मुलीला पळवले असते,’ असे वक्तव्य केल्याने गुचैत कुटुंबीयांसह रहिवाशांनी तायडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रोहन पडघा येथील एका इंग्रजी शाळेत सातवी इयत्तेत शिकत होता.