करोना संकटात केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे हे वाढवलेले खतांचे दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी एका पत्राद्वारे केली होती. रासायनिक खतांच्या किंमतीत केंद्र सरकारने ७०० ते ८०० रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोलच्या किमती शंभर पार असतानाचं केंद्राने खतांच्या किमती भरमसाठ वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका विरोधकांनी केली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
“खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून ‘किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने व्याजासह वसूल करायचं सरकारने ठरवलं की काय, अशी शंका येते. करोनाच्या काळात उद्योगांचे कंबरडे मोडून बेकारी वाढत असताना शेती हेच एकमेव क्षेत्र आहे. जे लोकांच्या जगण्याचा आधार बनलंय. अशा परिस्थितीत खतांच्या किंमती वाढवून हा आधारही सरकारने काढून घेऊ नये आणि या वाढीव किंमती तातडीने कमी कराव्यात, ही विनंती!”, असे रोहित पवार म्हणाले.
खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून ‘किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने व्याजासह वसूल करायचं सरकारने ठरवलं की काय अशी शंका येते. कोरोनाच्या काळात उद्योगांचे कंबरडे मोडून बेकारी वाढत असताना शेती हेच एकमेव क्षेत्र आहे जे लोकांच्या जगण्याचा आधार बनलंय. https://t.co/mc4avfWiwN
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 17, 2021
यापुर्वी कृषीमंत्री दादा भुसे यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दरवाढ कमी करण्याची मागणी केली होती. करोनामुळे शेतीचे कामे सुरू असली तरी बाजारपेठा बंद असल्याने शेतकरी अडचणीत आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत झालेली वाढ अव्वाच्या सव्वा आहे आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही. बऱ्याच खतांच्या किंमतीत ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्याची करोनाची स्थिती पाहता ही दरवाढ तातडीनं मागे घ्यावी, अशी विनंती कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली होती.
तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. “पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढल्याचा धक्का सर्व भारतीयांना लागलाच आहे. मात्र आता खतांच्या किमती प्रचंड वाढविण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. करोनाने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या माथी हा दरवाढीचा बोजा टाकत केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या खतांच्या दरवाढीचा निषेध करते. आमचा शेतकरी बांधव याविरोधात आंदोलन करणार आहे. त्या आंदोलनास देशभरातून प्रतिसाद मिळेल, हा मला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील”, असे जयंत पाटील म्हणाले होते.
पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढल्याचा धक्का सर्व भारतीयांना लागलाच आहे मात्र आता खतांच्या किमती प्रचंड वाढविण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. कोरोनाने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या माथी हा दरवाढीचा बोजा टाकत केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे. https://t.co/fj1pJLNNmL
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 16, 2021
काय आहेत खतांचे दर
१०.२६.२६ ची किंमती ६०० रुपयांनी वाढली आहे. डीएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डीएपी ११८५ रुपयाला होता, तो आता १०९९ रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ चे पन्नास किलोचे पोते ११७५ रुपयांचे होते. तेच आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमतीही वाढवल्या आहेत. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक मोठे संकट निर्माण झालं आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते.