कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार मतदारसंघातील एमआयडीसीच्या प्रश्नावरून विधान भवन येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलनाला बसले होते. यावरून शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. अडीच वर्षे सरकार असताना एमआयडीसीचा विषय दिसला नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. याला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“अडीच वर्षे सरकार असताना एमआयडीसीचा विषय दिसला नाही. अडीच वर्षे काय करत होता? विधानसभा चालू असताना काही आमदारांना नाटक करण्याची सवय आहे. त्याच नाटकातील हा एक पार्ट होता,” असे टीकास्र संजय शिरसाट यांनी रोहित पवारांवर डागलं.
हेही वाचा : “अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत, पण…”, ‘त्या’ वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदाराचा इशारा
“…तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत”
“आमदाराने आपल्या प्रश्नासाठी पाठपुरावा करावा लागतो. सरकारी यंत्रणा किती कामे करतात, हे सर्वांना माहिती आहे. पाठपुरावा कमी पडला, तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत,” असा टोलाही शिरसाट यांनी रोहित पवारांना लगावला आहे.
“उगाच येऊन काहीतर बोलायचं अन्…”
संजय शिरसाट यांच्या वक्तव्यांवर रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “संजय शिरसाट यांनी कुठेतरी वक्तव्य करण्यापेक्षा हिंमत असेल, तर माझ्यासमोर येऊन बोलावं. माहिती नसलेल्या गोष्टींवर राजकारण कराल, तर याद राखा. आम्ही तुम्हाला सोडणार नाही. उगाच येऊन काहीतर बोलायचं आणि स्वत:ची टिमकी वाजवायची हे बंद करा,” असं प्रत्युत्तर रोहित पवार यांनी शिरसाट यांना दिलं आहे.
हेही वाचा : ऑगस्टमध्ये परिवर्तन? अजित पवार मुख्यमंत्री होणार? राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार म्हणाले…
“महाराष्ट्रातील अनेक एमआयडीसी प्रलंबित आहेत”
“सरकार कोणत्या पद्धतीने काम करते हे लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. माझ्याच मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न आहे, असं नाही. महाराष्ट्रातील अनेक एमआयडीसी प्रलंबित आहेत. महाराष्ट्रातील हक्कांचे प्रकल्प गुजरात निवडणुकीसाठी नेले जातात, तेव्हा तुम्ही झोपा काढता. महापुरुषांचा आणि लोकांचा अपमान झाल्यावर गप्प बसता,” असा सवालही रोहित पवार यांनी शिरसाट यांना विचारला आहे.