अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज (२९ ऑगस्ट) थेट मंत्रालयात आंदोलन केलं. या धरणग्रस्तांना महाराष्ट्र शासनाने नोकरी आणि मोबदल्याचं आश्वासन दिलं होतं, जे गेल्या ४५ वर्षांमध्ये कोणत्याही सरकारने पूर्ण केलं नाही असा आरोप करत धरणग्रस्तांनी आज थेट मंत्रालयात आंदोलन केलं. मंत्रालयात कोणीही आत्महत्या करू नये यासाठी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर बसवण्यात आलेल्या सुरक्षा जाळीवर उड्या मारत धरणग्रस्तांनी आंदोलन केलं. सुरक्षा जाळीवर उतरलेल्या धरणग्रस्तांनी त्यांच्या मागण्या मांडल्या, तसेच घोषणा दिल्या. यावेळी ३० पेक्षा जास्त धरणग्रस्त सुरक्षा जाळीवर उतरले होते. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलक धरणग्रस्तांना ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, या आंदोलनावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार यांच्या गटातील आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रोहित पवार म्हणाले, या आंदोलनाची कुठे ना कुठेतरी, कोणी ना कोणीतरी दखल घेतली पाहिजे. मुद्दाम कोणीही असं करत नाही, मुद्दाम कोणी अशा उड्या मारत नाही. कोणीही अशा उड्या मारू नये. कोणीही अशा पद्धतीने आंदोलन करू नये.
आमदार रोहित पवार म्हणाले, अशा प्रकारचं आंदोलन कोणी करू नये, परंतु, त्यांचा (धरणग्रस्तांचा) आवाज कोणीच ऐकत नसेल तर अशा पद्धतीने काही गोष्टी कराव्या लागतात. या सरकारने आजच त्यांना वेळ देऊन त्यांच्या आडचणी सोडवल्या पाहिजेत. परंतु, हा विषय सोडला तर आज महाराष्ट्रात काय चाललंय? राज्यातल्या शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, युवकांचे प्रश्न आहेत, हे सरकार राज्यातल्या प्रश्नांसदर्भात गंभीर नाही.
हे ही वाचा >> “…तरी यांची घागर उताणीच राहणार”, दहिहंडीच्या आयोजनावरून ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल
आमदार रोहित पवार म्हणाले, राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत. राज्यासमोर सध्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. परंतु एकीकडे महागाई-बेरोजगारीसारखे प्रश्न आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला फक्त नवा मुख्यमंत्री कोण होणार? कोण उपमुख्यमंत्री होणार? कोणाला मंत्रीपद मिळणार? याच्याच चर्चा ऐकायला मिळत आहेत. या चर्चेपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय हवं आहे? यावर चर्चा होणं गरजेचं आहे.