कर्जत-जामखेड येथे एमआयडीसीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. पण, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित पवार यांची समजूत काढत आश्वासन दिलं. यानंतर रोहित पवारांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. यानंतर ‘मुंबई तक’शी बोलताना रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. तर तो अडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर केला आहे.
मतदारसंघात एमआडीसी उभारल्यानंतर श्रेयवादाचा लढा सुरु होईल, म्हणून अडवणूक होते का? असा प्रश्न विचारल्यावर रोहित पवार म्हणाले, “असू शकते. माझ्या विरोधकाने एमआयडीसीचे श्रेय घेण्याची हिंमत दाखवावी. लोकांना माहिती नाही का? लोक साधी असतात का? की त्यांना कळत नाही? हा श्रेयवादाचा नाही, तर तरुणांना न्याय देण्याचा विषय आहे. मी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. तर, तो अडवणूक करण्याचा प्रयत्न करतोय. अडवायचं तर, अडवून दाखव. तुझ्याकडं आणि सरकारकडेही बघतो.”
हेही वाचा : “…तर याद राखा”, ‘त्या’ वक्तव्यावरून रोहित पवार संजय शिरसाट यांच्यावर संतापले
“हे दूरदृष्टी नसलेल्यांना काय कळणार?”
“त्यांची विचारसारणी पाहिली, तर थेट इशारा द्यायचा नाही. त्यांचा अहंकार लोकांनी मोडलेला आहे. अजून नाटक करण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्यांदा उभे राहिल्यावर लोक अहंकार मोडतील. तरुण दुसऱ्या राज्यात आणि शहरात जाऊन काम करत असतील, तर त्यांच्याप्रती आपला अधिकार नाही का? अदाणी आणि जिंदाल या कंपन्यांबरोबर चर्चा झाली आहे. पण, एमआयडीसी नसेल तर कंपन्या कशा येणार? एमआयडीसी सुरु झाल्यावर कंपन्या सुरु होऊन नोकऱ्या मिळण्यासाठी दोन वर्षे लागतात. हे दूरदृष्टी नसलेल्यांना काय कळणार?” असा टोला रोहित पवार यांनी राम शिंदे यांना लगावला आहे.
हेही वाचा : “अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत, पण…”, ‘त्या’ वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदाराचा इशारा
“…तर आडवे कसे करायचे मला माहिती”
“तरुणांना न्याय कसा द्यायचा, हे आम्हाला माहिती आहे. पण, आमच्या प्रयत्नांना आडवे चालत असतील, तर ह्यांना लोकशाहीच्या मार्गाने आडवे कसे करायचं आम्हाला माहिती,” असा इशारा रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिला आहे.