मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील एमआयडीसीच्या मागणीसाठी विधानभवनाच्या आवारात भर पावसात आंदोनल करणाऱ्या रोहित पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी खडसावले. मंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवायला हवा, अशाप्रकारे आंदोलन करणे उचित नाही, असे ठणकावत पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमधील पाटेगाव- खंडाळा एमआयडीसीच्या मागणीवर सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप करीत विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या एमआयडीसीबाबत लवकर अधिसूचना काढण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. मात्र त्याची अंमलबजाणी होत नसल्याची नाराजी रोहित पवार यांनी व्यक्त केली. त्यांच्या आंदोलनाचे पडसाद विधानसभेत उमटले.
अनिल देशमुख यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना, उद्योगमंत्र्यांनी आश्वासन पाळले नाही म्हणून पवार आंदोलन करीत असल्याचे सांगितले. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाजवळ कोणी आंदोलन करू नये असे सभागृहात ठरले आहे. सरकार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार यांची समजूत काढून त्यांना सभागृहत आपले म्हणणे मांडण्यास सांगावे, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी
केली. रोहित पवार यांच्या आंदोलनावर अजित पवार यांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली.