मुंबई : गेल्यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस प्रदर्शित झालेला रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा बहुचर्चित मोठा चित्रपट दणकून आपटला. त्यानंतर बराच काळ ओटीटीवरचं पदार्पण आणि ‘खतरों के खिलाडी’ या शोचं सूत्रसंचलन यात रमलेला रोहित शेट्टी आता पुन्हा एकदा चित्रपटांच्या तयारीला लागला आहे. ‘सिंघम’ आणि ‘गोलमाल’ या दोन्ही त्याच्या गाजलेल्या चित्रपट श्रुंखलांपैकी त्याचा आगामी चित्रपट कोणता असेल? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर पहिला ‘सिंघम ३’ पूर्ण करणार आणि मग ‘गोलमाल ५’च्या तयारीला लागणार असल्याचे रोहित शेट्टीने स्पष्ट केले.
रोहित शेट्टीचे सूत्रसंचलन आणि ‘खतरों के खिलाडी’ हा साहसी खेळांचा शो हे गेल्या काही वर्षातलं घट्ट समीकरण झालं आहे. या शोचं तेरावं पर्व लवकरच ‘कलर्स’ वाहिनीवर दाखल होणार आहे. यानिमित्ताने माध्यमांशी बोलताना या शोनंतर रोहितचा कोणता चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. ‘सर्कस’ अपयशी ठरल्यानंतर रोहितने पुढच्या चित्रपटांचे काम थोडे लांबवले होते. ओटीटीवर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्याच्या तयारीत असलेल्या रोहित शेट्टीने ‘इंडियन पोलीस फोर्स’ या त्याच्या पहिल्यावहिल्या वेबमालिकेवर लक्ष केंद्रित केले होते. आता या वेबमालिकेचे आणि ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या पर्वाचे चित्रीकरणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तो आपल्या आगामी चित्रपटांच्या कामाला सुरूवात करणार आहे.
‘सिंघम ३’ची तयारी
रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ या विनोदी चित्रपट मालिकेला आत्तापर्यंत भरभरून यश मिळाले आहे. आत्तापर्यंत ‘गोलमाल’चे चार चित्रपट येऊन गेले आहेत आणि पाचवा चित्रपटही नक्कीच करणार असल्याचे त्याने सांगितले. मात्र त्याआधी तो ‘सिंघम ३’वर लक्ष केंद्रित करणार आहे. २०१४ मध्ये ‘सिंघम २’ प्रदर्शित झाला होता. त्यावेळी पहिल्यांदा ‘खतरो के खिलाडी’चे सूत्रसंचलन केले होते. आता नऊ वर्षांनी ‘सिंघम’च्या तिसऱ्या पर्वाची तयारी सुरू केल्याचे त्याने सांगितले. पुढच्या दोन-तीन महिन्यांत चित्रीकरण सुरू होईल, अशी माहिती त्याने दिली. त्यामुळे पुढचे वर्ष ‘सिंघम ३’चे असेल. त्यानंतर पुढच्या चित्रपटांचा विचार करेन, असे त्याने स्पष्ट केले.
‘सर्कस’चे अपयश माझेच…
अभिनेता रणवीर सिंगला मुख्य भूमिकेत घेऊन केलेल्या ‘सर्कस’ या मोठा निर्मिती खर्च असलेल्या चित्रपटाला केवळ ३२ कोटी रुपये कमाई करता आली. त्याच्या अपयशाचं खापर दुसऱ्या कोणावरही मी फोडणार नाही, असे सांगत माझ्या चित्रपटांचे यश जसे माझे आहे तसे अपयशही माझेच आहे, असे रोहितने ठामपणे सांगितले.